For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इंग्लंडची मालिकेत विजयी आघाडी

06:07 AM Dec 10, 2023 IST | Tarun Bharat Portal
इंग्लंडची मालिकेत विजयी आघाडी
Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील येथे शनिवारी खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने यजमान भारताचा 52 चेंडू बाकी ठेऊन 4 गड्यांनी पराभव करत 2-0 अशी विजयी आघाडी मिळविली. इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीसमोर यजमान भारताचा डाव 80 धावात आटोपला. या सामन्यात इंग्लंडने 11.2 षटकात 6 बाद 82 धावा जमविल्या. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडच्या महिला संघाने जिंकून यापूर्वीच आघाडी मिळविली आहे.

वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या दिवस रात्रीच्या या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. भेदक गोलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर इंग्लंडने भारताचा डाव 16.2 षटकात 80 धावात उखडला. भारताच्या डावामध्ये जेमिमा रॉड्रिक्सने तसेच स्मृती मानधनाने दुहेरी धावसंख्या गाठली. उर्वरीत फलंदाजांना अधिक धावा जमविता आल्या नाहीत. रॉड्रिक्सने 33 चेंडूत 2 चौकारांसह 30, मानधनाने 9 चेंडूत 2 चौकारांसह 10, कर्णधार कौरने 2 चौकारांसह 9, घोषने 1 चौकारासह 4, श्रेयांका पाटीलने 4, सायका इशाकीने 9 चेंडूत 1 चौकारासह 8 धावा जमविल्या. शेफाली वर्मा आणि दिप्ती शर्मा यांना खाते उघडता आले नाही. भारताच्या डावात 8 चौकार नोंदविले गेले. भारताने पॉवरप्ले दरम्यानच्या पहिल्या 6 षटकात 33 धावा जमविताना 4 गडी गमविले. भारताचे अर्धशतक 63 चेंडूत फलकावर लागले. इंग्लंडतर्फे चार्ली डीन, लॉरेन बेल, सोफी इक्लेस्टोन आणि सारा ग्लेन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. केंप व नॅट स्किव्हेर ब्रंट यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

Advertisement

प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडने 11.2 षटकात 8 बाद 82 धावा जमवित मालिका हस्तगत केली. इंग्लंडच्या डावात सलामीच्या डंक्लेने 13 चेंडूत 2 चौकारांसह 9, कॅप्सेने 21 चेंडूत 4 चौकारांसह 25, नॅट स्किव्हेर ब्रंटने 13 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 16, कर्णधार नाईटने 1 चौकारासह नाबाद 7, जोन्सने 5 तर इक्लेस्टोनने 5 चेंडूत 1 चौकारासह नाबाद 9 धावा जमविल्या. इंग्लंडच्या डावामध्ये 1 षटकार आणि 8 चौकार नोंदविले गेले. भारतातर्फे रेणुकासिंग आणि दिप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 तर पुजा वस्त्रकर व इशाकी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. इंग्लंडने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 40 धावा जमविताना 2 गडी गमविले होते.

संक्षिप्त धावफलक - भारत 16. 2 षटकात सर्वबाद 80 (रॉड्रिक्स 2 चौकारासह 30, मानधना 2 चौकारासह 10, कौर 9, इशाकी 8, वस्त्रकर 6, घोष 4, अवांतर 5, चार्ली डीन, लॉरेन बेन, इक्लेस्टोन व ग्लेन प्रत्येकी 2 बळी, केंप आणि नॅट स्किव्हेर ब्रंट प्रत्येकी 1 बळी). इंग्लंड 11.2 षटकात 6 बाद 82 (डंक्ले 9, कॅप्से 25, नॅट स्किव्हेर ब्रंट 16, नाईट नाबाद 7, जोन्स 5, इक्लेस्टोन नाबाद 9, अवांतर 11, रेणुकासिंग, दिप्ती शर्मा प्रत्येकी 2 बळी, इशाकी व वस्त्रकर प्रत्येकी 1 बळी).

Advertisement
Tags :

.