इंग्लंडचा न्यूझीलंडवर रोमांचक विजय
सामनावीर विल जॅक्स-रेहान अहमद यांचे अष्टपैलू योगदान, रवींद्रचे 3 बळी
वृत्तसंस्था/ कोलंबो, लंका
सामनावीर विल जॅक्स व रेहान अहमद यांच्या अष्टपैलू कामगिरीच्या आधारे टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर एटमधील सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडवर 4 गड्यांनी रोमांचक विजय मिळविला. इंग्लंडने याआधीच या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे तर न्यूझीलंडची आगेकूच शनिवारी होणाऱ्या लंका-पाक सामन्याच्या निकालावर अवलंबून असेल.
न्यूझीलंड पराभूत झाल्याने पाकच्या आशा पल्लवीत झाल्या असून पल्लेकेलेत होणाऱ्या आजच्या सामन्यात पाकला लंकेवर 64 धावांनी किंवा आव्हानाचा पाठलाग करावयाचा असल्यासे 13.1 षटकांत विजय मिळवावा लागेल. अन्यथा न्यूझीलंड उपांत्य फेरीत खेळण्याची संधी मिळेल. इंग्लंडने सुपरएटमधील गट 2 मध्ये 3 विजय मिळवित आघाडीचे स्थान मिळविले.
या सामन्यात इंग्लंडकडून फलंदाजी मिळाल्यानंतर न्यूझीलंडला फिरकी गोलंदाजांच्या शिस्तबद्ध माऱ्यामुळे निर्धारित 20 षटकांत 7 बाद 159 धावांच जमविता आल्या. त्यानंतर 17 षटकांत 6 बाद 117 धावा जमविल्यानंतर इंग्लंड अडचणीत आले होते. यावेळी त्यांना 18 चेंडूत 43 धावांची जरूरी होती. पण विल जॅक्स (18 चेंडूत नाबाद 32) व रेहान अहमद (7 चेंडूत नाबाद 19) यांनी ग्लेन फिलिप्सने टाकलेल्या 18 व्या षटकांत तब्बल 22 धावा फटकावत विजयाची संधी निर्माण केली. यावेळी त्यांना 12 चेंडूत 21 धावांची गरज असताना सँटनरच्या पुढच्या षटकात 16 धावा वसूल केल्याने शेवटच्या षटकांत त्यांना 5 धावांची गरज लागली. हेन्रीच्या शेवटच्या षटकातील पहिल्या दोन चेंडूवर एकेक धाव निघाली आणि तिसऱ्या चेंडूवर जॅक्सने चौकार ठोकत इंग्लंडचा विजय साकार केला. जॅक्स व अहमद यांनी सातव्या गड्यासाठी अभेद्य 44 धावांची भागीदारी केली. इंग्लंडने 19.3 षटकांत 6 बाद 161 धावा जमविल्या.
त्याआधी जॅक्स (23 धावांत 2 बळी), आदिल रशिद (28 धावांत 2 बळी) व रेहान अहमद (28 धावांत 2 बळी) यांनी मधल्या षटकांत भेदक मारा केल्यानंतर न्यूझीलंडला धावांसाठी संघर्ष करावा लागला. फिलिप्स (28 चेंडूत 39) व टिम सीफर्ट (25 चेंडूत 35), फिन अॅलन (19 चेंडूत 29) यांनी न्यूझीलंडतर्फे प्रमुख योगदान दिले.
इंग्लंडची सुरुवात 2 बाद 2 अशी झाल्यानंतर हॅरी ब्रूक (24 चेंडूत 26), जेकब बेथेल (16 चेंडूत 21) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. नवव्या षटकांत त्यांची स्थिती 4 बाद 58 अशी होती. पण टॉम बँटन व सॅम करन यांनी 42 धावांची भर घालत आशा जिवंत ठेवल्या. रचिन रवींद्रने आधी बेथेलला नंतर करन व बँटन यांना बाद करून इंग्लंडवर दडपण आणले होते. मात्र जॅक्स व अहमद यांनी जोरदार प्रतिकार करीत इंग्लंडला विजय मिळवून दिला. रवींद्रने 19 धावांत 3 बळी मिळविले.
संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड 20 षटकांत 7 बाद 159 : सीफर्ट 25 चेंडूत 35, अॅलन 19 चेंडूत 29, रवींद्र 11, फिलिप्स 28 चेंडूत 39, चॅपमन 9 चेंडूत 15, मॅकॉन्ची 12 चेंडूत 14, अवांतर 3. आदिल रशिद 2-28, विल जॅक्स 2-23, रेहान अहमद 2-28.
इंग्लंड 19.3 षटकांत 6 बाद 161 : ब्रूक 24 चेंडूत 26, बेथेल 16 चेंडूत 21, बँटन 24 चेंडूत 33, सॅम करन 22 चेंडूत 24, जॅक्स 18 चेंडूत नाबाद 32 (4 चौकार, 1 षटकार), रेहान अहमद 7 चेंडूत नाबाद 19 (1 चौकार, 2 षटकार), अवांतर 4. रचिन रवींद्र 3-19, फिलिप्स 1-43, फर्ग्युसन 1-14, हेन्री 1-19.