इंग्लंडचा 823 धावांचा डोंगर
पाकविरुद्ध कसोटीतील चौथी सर्वोच्च धावसंख्या : हॅरी ब्रुकचे त्रिशतक तर जो रुटचे द्विशतक
वृत्तसंस्था/मुलतान
येथील मुलतानच्या पाट खेळपट्टीवर इंग्लंडने कसोटी क्रिकेट इतिहासातील चौथी सर्वात मोठी धावसंख्या केली आहे. इंग्लंडने चौथ्या दिवशी पहिला डाव हा 7 बाद 823 धावांवर घोषित केला व 267 धावांची आघाडी घेतली. हॅरी ब्रुकने त्रिशतक तर जो रुटने द्विशतक झळकावत घरच्या मैदानावर खेळणाऱ्या पाकच्या गोलंदाजांची तुफानी धुलाई केली. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पाकने 37 षटकांत 6 गडी गमावत 152 धावा केल्या आहेत. अद्याप ते 115 धावांनी पिछाडीवर असून डावाने पराभव टाळण्याचे पाकसमोर आव्हान असणार आहे. दिवसअखेरीस सलमान आगा 41 व अमीर जमाल 27 धावांवर नाबाद राहिले.
प्रारंभी, इंग्लंडने 3 बाद 492 धावसंख्येवरुन चौथ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात केली. जो रुट आणि हॅरी ब्रूक यांच्यातील अतुलनीय भागीदारीने आज इतिहास रचला, या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 454 धावांची मोठी भागीदारी केली. या दोघांनी पाकच्या गोलंदाजांचा यथेच्छ समाचार घेताना चौफेर फटकेबाजी केली. रुट व ब्रुक यांच्यातील ही कसोटी क्रिकेटमधील चौथ्या क्रमाकांची सर्वोत्तम भागीदारी ठरली. दरम्यान, रुटने कसोटी कारकिर्दीतील सहावे द्विशतक साजरे करताना 375 चेंडूत 17 चौकारासह 262 धावा केल्या. त्याला आगा सलमानने बाद केले. दुसऱ्या बाजूने
हॅरी ब्रुकने आपले त्रिशतक झळकावताना 322 चेंडूत 29 चौकार व 3 षटकारासह 317 धावा फटकावल्या. त्रिशतकानंतर मात्र तो सईम आयुबच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. जेमी स्मिथने 31 तर ख्रिस वोक्सने 17 धावा केल्या. यानंतर इंग्लिश कर्णधार ओली पोपने आपला पहिला डाव 7 बाद 823 धावांवर घोषित केला व 267 धावांची भक्कम आघाडी देखील घेतली.
दुसऱ्या डावात पाकची घसरगुंडी
इंग्लंडने पहिला डाव 823 धावांवर घोषित केल्यानंतर दुसऱ्या डावात पाकची सुरुवात खराब झाली. सलामीवीर अब्दुल शफीकला भोपळाही फोडता आला नाही. तर अनुभवी बाबर आझम (5), कर्णधार शान मसूद (11), सईम आयुब (25) हे स्टार फलंदाज सपशेल अपयशी ठरले. यानंतर ठराविक अंतराने गडी बाद होत गेल्याने पाकची एकवेळ 6 बाद 82 अशी स्थिती होती. पण, सलमान आगा व अमीर जमाल यांनी 70 धावांची भागीदारी करत दिवसअखेरीस आणखी पडझड होऊ दिली नाही. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पाकने 37 षटकात 6 गडी गमावत 152 धावा केल्या होत्या. अद्याप ते 115 धावांनी पिछाडीवर आहेत. डावाने पराभव टाळण्याचे मोठे संकट पाकसमोर असणार आहे.
जो रुट मुलतानचा नवा सुलतान
कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडचा फलंदाज जो रुटची बॅट थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. रुट आता मुलतानचा नवा सुलतान बनला आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. रूटने पाकिस्तानविरुद्ध कसोटी क्रिकेटमधलं दुसरे द्विशतक झळकावलं आहे. त्याने 375 चेंडूत 262 धावा करताना कसोटी कारकिर्दीतील सहावे द्विशतक साजरे केले. त्याने 2016 मध्ये मँचेस्टरमध्ये पाकिस्तानविरुद्ध 254 धावांची इनिंग खेळली होती. ही त्याची कसोटीतील सर्वोत्तम धावसंख्या आहे. याशिवाय, श्रीलंकेविरुद्ध दोन आणि न्यूझीलंड आणि पाकिस्तानविरुद्ध प्रत्येकी एक द्विशतक झळकावले आहे.
ब्रुकचा त्रिशतकी धमाका
इंग्लंडच्या हॅरी ब्रूकने मुलतानच्या प्रसिद्ध क्रिकेट मैदानावर पाकविरुद्ध त्रिशतक झळकावून इतिहास रचला आहे. हे तेच मैदान आहे जिथे 2004 मध्ये वीरेंद्र सेहवागने पाकविरुद्ध त्रिशतक झळकावले होते आणि मुलतानचा सुलतान होण्याचा मान मिळवला होता. हॅरीने सेहवागच्या शैलीत 144 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर सॅम अयुबला चौकार मारून त्रिशतक पूर्ण केले. कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा तो इंग्लंडचा सहावा फलंदाज ठरला आहे. विशेष म्हणजे, ब्रूकने 310 चेंडूत त्रिशतक पूर्ण केले. त्याने 28 चौकार आणि 3 षटकारांची आतषबाजी केली. वीरेंद्र सेहवागनंतर कसोटीतील हे दुसरे सर्वात जलद त्रिशतक आहे.
कसोटीत सर्वात जलद त्रिशतक करणारे फलंदाज (चेंडूच्या बाबतीत)
- 278 चेंडू - सेहवाग वि द. आफ्रिका, चेन्नई, 2008
- 310 चेंडू - हॅरी ब्रूक वि पाकिस्तान, मुलतान, 2024
- 362 चेंडू - मॅथ्यू हेडन वि झिम्बाब्वे, पर्थ, 2003
- 364 चेंडू - सेहवाग वि पाकिस्तान, मुलतान, 2004
संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान प.डाव 556 व दुसरा डाव 37 षटकांत 6 बाद 152 (सईम आयुब 25, शान मसूद 11. बाबर आझम 5, सौद शकील 29, सलमान आगा खेळत आहे 41, जमाल खेळत आहे 27, अॅटकिन्सन व कार्स प्रत्येकी दोन बळी).
इंग्लंड पहिला डाव 150 षटकांत 7 बाद 823 धावांवर घोषित (क्रॉली 78, डकेट 84, जो रुट 262, हॅरी ब्रुक 317, जेमी स्मिथ 31, वोक्स नाबाद 17, नसीम शाह व सईम आयुब प्रत्येकी दोन बळी).