For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दुसऱ्या कसोटीवर इंग्लंडचे पूर्ण वर्चस्व

01:53 AM Aug 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
दुसऱ्या कसोटीवर इंग्लंडचे पूर्ण वर्चस्व
Advertisement

पाक मोठ्या पराभवाच्या छायेत : इंग्लंडला 357 धावांची आघाडी

Advertisement

वृत्तसंस्था, लंडन

येथे सुरु असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत शनिवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी वारंवार पावसाच्या अडथळ्यामुळे केवळ 25 षटकांचा खेळ झाला आणि इंग्लंडने दुसऱ्या डावात 46.5 षटकात 7 बाद 177 धावा जमवित पाकवर 357 धावांची भक्कम आघाडी मिळवली आहे. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात लॉरेन्सने अर्धशतक झळकवले.

Advertisement

या मालिकेत इंग्लंडने पहिली कसोटी केवळ दोन दिवसात जिंकून पाकवर आघाडी घेतली आहे. या दुसऱ्या कसोटीत लॉर्ड्सच्या खेळपट्टीवर इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी पाकला पहिल्या डावात केवळ 110 धावांत गुंडाळले. तत्पूर्वी इंग्लंडने पहिल्या डावात 290 धावांपर्यंत मजल मारली होती. इंग्लंडने पहिल्या डावात 180 धावांची आघाडी मिळवली. या कसोटीमध्ये खेळाच्या पहिल्या तीन दिवसांत वारंवार पावसामुळे बराच खेळ वाया गेला.

इंग्लंडने 3 बाद 81 या धावसंख्येवरुन शनिवारी तिसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे सुरुवात केली. पण मैदान आणि खेळपट्टी ओलसर असल्याने उपहारापर्यंत खेळ होऊ शकला नाही. उपहारानंतर पावसाने विश्रांती घेतली आणि खेळाला पुढे सुरुवात झाली. चहापानापर्यंत इंग्लंडने 44.3 षटकात 6 बाद 162 धावा जमविल्या होत्या. चहापानानंतर पुन्हा खेळ सुरु झाला आणि लॉरेन्सने अर्धशतक पूर्ण केले. अॅटकिन्सन मोहम्मद अलीच्या गोलंदाजीवर बाद झाला. तत्पूर्वी इंग्लंडचा सलामीचा फलंदाज गे मोहम्मद अब्बासच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्याने 6 चौकारांसह 31 धावा जमविल्या. त्यानंतर हॅरी ब्रुकला मोहम्मद अब्बासने झेलबाद केले. त्याने 5 चौकारांसह 34 धावा जमविल्या. इंग्लंडचा निम्मा संघ 128 धावांत तंबूत परतला. मोहम्मद अब्बासने इंग्लंडला आणखी एक धक्का देताना स्मिथला 7 धावांवर झेलबाद केले. पावसाचा अडथळा आल्याने खेळ थांबविण्यात आल. त्यावेळी इंग्लंडने दुसऱ्या डावात 46.5 षटकात 7 बाद 177 धावा जमविल्या होत्या. लॉरेन्स 2 षटकार आणि 6 चौकारांसह 50 धावांवर खेळत आहे. पाकतर्फे मोहम्मद अब्बासने 3 तर खुर्रम शेहजाद आणि मोहम्मद अली यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक - इंग्लंड प. डाव 290, पाक प. डाव 110, इंग्लंड दु. डाव 46.5 षटकात 7 बाद 177 (लॉरेन्स खेळत आहे 50, गे 31, रुट 24, ब्रुक 34, मोहम्मद अब्बास 3-48, खुर्रम शेहजाद व मोहम्मद अली प्रत्येकी 2 बळी).

Advertisement
Tags :

.