For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इंग्लंड युवा संघ अंतिम फेरीत

06:58 AM Feb 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
इंग्लंड युवा संघ अंतिम फेरीत
Advertisement

ऑस्ट्रेलिया युवा संघावर 27 धावांनी विजय, थॉमस रिव सामनावीर, ऑलिव्हर पीकचे शतक वाया

Advertisement

वृत्तसंस्था / बुलावायो (झिम्बाब्वे)

19 वर्षांखालील वयोगटातील आयसीसीच्या पुरूषांच्या युवा विश्व चषक क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात थॉमस रिवच्या दमदार शतकाच्या जोरावर इंग्लंड युवा संघाने बलाढ्या ऑस्ट्रेलियाचा 27 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. थॉमस रिवला सामनावीराचा बहुमान देण्यात आला.

Advertisement

या सामन्यात इंग्लंड युवा संघाला विजयाची नितांत गरज असल्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. इंग्लंडने निर्धारित 50 षटकांत 7 बाद 277 धावा जमविल्या. त्यानंतर ऑलिव्हर पीकने झुंजार शतक नोंदवले असले तरी इंग्लंडने ऑस्ट्रेलिया युवा संघाचा डाव 47.3 षटकांत 250 धावांत गुंडाळून अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. भारत व अफगाण यांच्यात दुसरा उपांत्य सामना होणार असून यातील विजयी संघाविरुद्ध इंग्लंडचा जेतेपदाचा सामना होणार आहे.

278 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाची खराब सुरुवात झाली आणि 13 व्या षटकांत 2 बाद 47 अशी त्यांची स्थिती झाली. नितेश सॅम्युअल (47) व ऑलिव्हर पीक (88 चेंडूत 100) यांनी तिसऱ्या गड्यासाठी 66 धावांची भागीदारी केली. पण सॅम्युअल बाद झाल्यानंतर आर्यन शर्मा (34), जेडेन ड्रेपर (12), हेडन शिलर (15) यांना भरीव योगदान देता न आल्याने ऑस्ट्रेलियाचा डाव 250 धावांत संपुष्टात आला. पीकने जोरदार प्रयत्न केले. पण तो 100 धावांवर शेवटच्या गड्याच्या रूपात बाद झाला. त्याने 88 चेंडूंच्या खेळीत 10 चौकार, 1 षटकार मारले. इंग्लंडच्या सेबॅस्टियन मॉर्गन, जेम्स मिन्टो, मॅनी लम्सडन, राल्फी अल्बर्ट यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले.

थॉमस रिवचे शतक

इंग्लंड युवा संघाचा कर्णधार थॉमस रिवने कप्तानी खेळी करताना 107 चेंडूत 1 षटकार आणि 14 चौकारांसह 110 धावांचे योगदान दिले. 39 व्या षटकात त्याने एकेरी धाव घेत आपले शतक पूर्ण केले. बेन डॉकीन्स आणि जोसेफ मूर्स यांनी इंग्लंडच्या डावाला सुरूवात केली पण पहिल्याच षटकांत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाजी व्हिल बायरॉमने डॉकीन्सला बाद केले. त्याने केवळ 1 धाव जमविली. त्यानंतर मूर्स आणि बेन मेस यांनी दुसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागिदारी केली. ऑस्ट्रेलियन संघातील आर्यन शर्माने मूर्सचा झेल टिपला. त्याने 33 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारांसह 25 धावा जमविल्या. यानंतर इंग्लंडने आपला तिसरा गडी पुढील षटकांत गमविला. बेन मेसने 33 चेंडूत 3 चौकारांसह 24 धावा जमविल्या. हेडन स्किलरने त्याचा त्रिफळा उडविला.

कर्णधार रिव आणि कॅलेब फॉकनर यांनी संघाचा डाव सावरताना धावफलक सातत्याने हलता ठेवला. या जोडीने चौथ्या गड्यासाठी 135 धावांची शतकी भागिदारी केली. फॉकनरने 53 चेंडूत 4 चौकारांसह 40 धावा जमविल्या. डावातील 36 व्या षटकांत इंग्लंडची ही चौथी फोडण्यात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना यश मिळाले. ऑस्ट्रेलियाच्या नेडन कुरेने फॉकनरला बाद केले. इंग्लंडच्या अल्बर्टने 2 चौकारांसह 13 चेंडूत 15 धावा जमविल्या. कुरेने त्याला बाद केले. फरहान अहमद कर्णधार रिवला साथ देण्यासाठी मैदानात आला. 43 व्या षटकात एकेरी धाव घेण्याच्या नादात कर्णधार रिव होगनच्या अचूक फेरीवर धावचीत झाला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या डावातील शेवटची 9 षटके अत्यंत किफायतशीर टाकली. फरहान अहमदने 1 षटकार आणि 1 चौकारासह 26 चेंडूत नाबाद 28 धावा केल्या. इंग्लंडचा युवा संघ या स्पर्धेतील दुसरे विजेतेपद मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. ऑस्ट्रेलियाचा युवा संघ हा या स्पर्धेतील विद्यमान विजेता आहे.

आयसीसी युवा विश्व क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात भारताने आतापर्यंत विक्रमी  5 वेळा अजिंक्यपद मिळविले असून ऑस्ट्रेलियाने 4 वेळा, पाकने दोनवेळा तर बांगलादेश, इंग्लंड, द. आफ्रिका आणि विंडीज यांनी प्रत्येकी एकदा ही स्पर्धा जिंकली आहे.

संक्षिप्त धावफलक: इंग्लंड युवा संघ 50 षटकांत 7 बाद 277 (थॉमस रिव 110, मूर्स 25, बेन मेस 24, फॉकनर 40, अल्बर्ट 15, फरहान अहमद नाबाद 28, मॉर्गन 15, अवांतर 17, कुरे व स्किलर प्रत्येकी 2 बळी, बिरॉम व आर्यन शर्मा प्रत्येकी 1 बळी).

ऑस्ट्रेलिया युवा संघ 47.3 षटकांत सर्व बाद 250 : ऑलिव्हर पीक 88 चेंडूत 100, नितेश सॅम्युअल 47, आर्यन शर्मा 34, हेडेन शिलर व मालासझुक प्रत्येकी 15, अवांतर 15. मॉर्गन 2-33, मिन्टो 2-30, लम्सडन 2-55, अल्बर्ट 2-45, अॅलेक्स फ्रेंच 1-36.

Advertisement
Tags :

.