इंग्लंड युवा संघाची मालिकेत बरोबरी
रोमांचक सामन्यात भारत युवा संघावर एका गड्याने विजय
वृत्तसंस्था / नॉर्दम्प्टन
यजमान इंग्लंड आणि भारत युवा संघामध्ये सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना इंग्लंडने जिंकून बरोबरी साधली आहे. या दुसऱ्या सामन्यात यजमान इंग्लंड युवा संघाने भारतावर केवळ 1 गडी राखून निसटता विजय मिळविला. इंग्लंड संघातील थॉमस ऱ्यूने शानदार जलद शतक (131) झळकविले.
या मालिकेतील पहिला सामना भारतीय युवा संघाने 6 गड्यांनी जिंकून विजयी सलामी दिली होती. या दुसऱ्या सामन्यात इंग्लंड युवा संघाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. भारताचा डाव 49 षटकात 290 धावांवर आटोपला. त्यानंतर इंग्लंडने 49.3 षटकात 9 बाद 291 धावा जमवित हा सामना 3 चेंडू बाकी ठेवून एक गडी राखत जिंकला.
भारतीय युवा संघाच्या डावामध्ये सलामीच्या वैभव सूर्यवंशीने 45, विहान मल्होत्राने 49, राहुल कुमारने 47, कनिष्क चौहानने 45 आणि अभिज्ञान कुंडूने 32 धावांचे योगदान दिले. भारतीय युवा संघाचा कर्णधार आणि सलामीचा फलंदाज आयुष म्हात्रेने डावातील पहिल्याच चेंडूवर खाते उघडण्यापूर्वी बाद झाला. त्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांनी संघाचा डाव सावरला. या मालिकेतील पहिल्या सामन्यात सूर्यवंशीने 48 धावा जमविल्या होत्या तर या दुसऱ्या सामन्यातही 45 धावांचे योगदान दिले. इंग्लंडच्या युवा संघातर्फे फ्रेंचने 71 धावांत 4 तर जॅक होमने 63 धावांत 3 आणि अॅलेक्स ग्रीनने 50 धावांत 3 गडी बाद केले. या सामन्यात भारताला 32 आवांतर धावा मिळाल्या. त्यामध्ये 26 वाईडचा सामावेश आहे.
इंग्लंड युवा संघाच्या डावाला डळमळीत सुरूवात झाली. दुसऱ्याच षटकात सलामीचा डॉकीन्स 4 धावांवर बाद झाला. त्यानंतर इंग्लंडने आणखी दोन गडी लवकर गमविले. 12 षटकाअखेर इंग्लंडची स्थिती 3 बाद 47 अशी होती. भारतीय संघातील यजमान गोलंदाज अंबरिशने इंग्लंडच्या बेन मेसला 27 धावांत तर इसाक मोहम्मदला 11 धावांवर बाद केले. थॉमस रिव आणि रॉकी फ्लिंटॉप यांनी संघाचा डाव सावरताना चौथ्या गड्यासाठी 123 धावांची शतकी भागिदारी केली. रिवने 1 षटकार आणि 16 चौकारांसह 131 धावा झोडपल्या. कनिष्क चौहानने फ्लिंटॉपला 39 धावांवर 33 व्या षटकात बाद केले. 40 व्या षटकात पटेलने रिवला बाद केल्याने इंग्लंडची 46 षटकाअखेर स्थिती 8 बाद 254 अशी होती. इंग्लंडला शेवटया 3 षटकात विजयासाठी 20 धावांची जरुरी होती आणि त्यांचे तीन गडी खेळावयाचे होते. शेवटच्या दोन षटकामध्ये इंग्लंडला विजयासाठी 12 धावांची आवश्यकता होती आणि त्यांचे दोन गडी खेळावयाचे होते. 49 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर अबंरिशने ग्रीनला 12 धावांवर बाद केले. शेवटच्या षटकात इंग्लंडला विजयासाठी 7 धावांची आवश्यकता होती आणि त्यांची शेवटची जोडी मैदानात खेळत होती. मॉर्गनने गुहाच्या या शेवटच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर विजयी चौकार ठोकून भारतीय युवा संघाचे आव्हान संपुष्टात आणले. भारतातर्फे अंबरिशने 80 धावांत 4 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक: भारत 49 षटकात सर्वबाद 290 (सूर्यवंशी 45, मल्होत्रा 49, राहुल कुमार 47, चौहान 45, फ्रेंच 4-71, होम 3-63, ग्रीन 3-50), इंग्लंड 49.3 षटकात 9 बाद 291 (थॉमस ऱ्यू 131, फ्लिंटॉप 39, बेन मेस 27, ग्रीन 12, इसाक मोहम्मद 11, अंबरिश 4-80)