For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

इंग्लंड महिला संघाची विजयी सलामी

06:25 AM Apr 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
इंग्लंड महिला संघाची विजयी सलामी

अॅमी जोन्स सामनावीर, चार्ली डीनची अष्टपैलू चकम, न्यूझीलंडचा चार गड्यांनी पराभव

Advertisement

वृत्तसंस्था/ वेलिंग्टन

सामनावीर अॅमी जोन्स आणि अष्टपैलू चार्ली डीन यांच्या समयोचित अभेद्य शतकी भागिदारीच्या जोरावर सोमवारी येथे खेळविण्यात आलेल्या वनडे सामन्यात इंग्लंड महिला संघाने न्यूझीलंडचा 52 चेंडू बाकी ठेऊन 4 गड्यांनी पराभव केला. या विजयामुळे इंग्लंड महिला संघाने 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत विजयी सलामी दिली आहे.

Advertisement

या पहिल्या वनडे सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी दिली. न्यूझीलंडचा डाव 48.2 षटकात 207 धावांवर आटोपला. त्यानंतर इंग्लंडने 41.2 षटकात 6 बाद 209 धावा जमवित आपला विजय नोंदविला. या सामन्यात इंग्लंडची एकवेळ स्थिती 6 बाद 79 अशी केविलवाणी होती. पण त्यानंतर अॅमी जोन्स आणि चार्ली डीन यांनी अभेद्य शतकी भागिदारी करत विजय हस्तगत केला.

Advertisement

न्यूझीलंडच्या डावामध्ये सलामीच्या सुझी बेट्सने 74 चेंडूत 6 चौकारांसह 50 धावा जमविताना बेझुइडेनहाउटसमवेत 90 धावांची भागिदारी केली. बेझुइडेनहाउटने 62 चेंडूत 2 चौकारांसह 35 धावा जमविल्या. कर्णधार अॅमेलिया केरने 36 चेंडूत 1 चौकारासह 24, प्लिमरने 17, इसाबेला गेझने 1 चौकारासह 18, हन्नाह रोने 2 चौकारांसह 16 धावा जमविल्या. इंग्लंडच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. न्यूझीलंडच्या डावात 24 अवांतर धावा मिळाल्या. इंग्लंडतर्फे लॉरेन बेन आणि चार्ली डीन यांनी प्रत्येकी 3, केट क्रॉसने 2 तसेच नॅट सिव्हर ब्रंट व इक्लेस्टोन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. न्यूझीलंडने पहिल्या पॉवरप्लेच्या 10 षटकात 30 धावा जमविल्या. तर तिसऱ्या आणि शेवटच्या पॉवरप्लेमध्ये त्यांनी 42 धावांत 4 गडी गमाविले. बेट्सने 73 चेंडूत 6 चौकारांसह अर्धशतक झळकाविले.

प्रत्युत्तरादाखल खेळताना जेस केर आणि अॅमेलिया केर यांच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडचा डाव कोलमडला 17 षटकाअखेर इंग्लंडची स्थिती 6 बाद 79 अशी केविलवाणी झाली होती. डावातील पहिल्या चेंडूवर जेस केरने ब्यूमॉन्टचा खाते उघडण्यापूर्वीच त्रिफळा उडविला. माईया बाऊचरने 31 चेंडूत 5 चौकारांसह 31 धावा जमविल्या. कर्णधार नाईट 1 चौकारासह 12 धावांवर बाद झाली. नॅट सिव्हर ब्रंटने 2 चौकारांसह 12 धावा जमविल्या. पण ती एकेरी धाव घेण्याच्या नादात धावचीत झाली. अॅमेलिया केरने कॅप्सेला खाते उघडण्यापूर्वी पायचीत केले. तर त्यानंतर तिने वॅटचा त्रिफळा उडविला. वॅटने 13 चेंडूत 2 चौकारांसह 16 धावा जमविल्या. अॅमी जोन्स आणि डीन यांनी चिवट फलंदाजी करत आपल्या संघाला 4 गडी राखून विजय मिळवून दिला. या जोडीने सातव्या गड्यासाठी अभेद्य 130 धावांची भागिदारी केली. जोन्सने 83 चेंडूत 10 चौकारांसह नाबाद 92 तर डीनने 70 चेंडूत 1 चौकारासह नाबाद 42 धावा जमविल्या. इंग्लंडने पहिल्या पॉवरप्ले दरम्यानच्या 10 षटकात 44 धावा जमविताना 2 गडी गमाविले. जोन्सने आपले अर्धशतक 51 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने नोंदविले. तर जोन्स आणि डीन यांनी सातव्या गड्यासाठी शतकी भागिदारी 113 चेंडूत नोंदविली. न्यूझीलंडतर्फे जेस केर आणि अॅमेलिया केर यांनी प्रत्येकी 2 तसेच ताहुहुने 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक - न्यूझीलंड 48.2 षटकात सर्वबाद 207 (बेट्स 50, बेझुइडेनहाउट 35, अॅमेलिया केर 24, प्लिमेर 17, गेझ 18, रो 16, अवांतर 24, बेल 3-41, क्रॉस 2-24, डीन 3-57, नॅट सिव्हर ब्रंट आणि इक्लेस्टोन प्रत्येकी 1 बळी), इंग्लंड 41.2 षटकात 6 बाद 209 (अॅमी जोन्स नाबाद 92, डीन नाबाद 42, बाऊचर 31, नाईट 12, नॅट सिव्हर ब्रंट 12, वॅट 16, अवांतर 4, जेस केर 2-48, अॅमेलिया केर 2-46, ताहुहु 1-56).

Advertisement
Tags :
×

.