इंग्लंड महिला संघाची विजयी सलामी
वृत्तसंस्था/ बर्मिंगहॅम
पाकचा महिला क्रिकेट संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. या मालिकेतील झालेल्या पहिल्या सामन्यात यजमान इंग्लंडने पाकचा 53 धावांनी दणदणीत पराभव करत विजयी सलामी दिली. या सामन्यात इंग्लंडच्या अॅमी जोन्सला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
पाकने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी दिली. इंग्लंडने 20 षटकात 6 बाद 163 धावा जमविल्या. त्यानंतर पाकचा डाव 18.2 षटकात 110 धावांत आटोपला.
इंग्लंडच्या डावामध्ये कर्णधार नाईटने 44 चेंडूत 6 चौकारांसह 49, अॅमी जोन्सने 27 चेंडूत 6 चौकारांसह 37, डॅनीली गिब्सनने 21 चेंडूत 8 चौकारांसह नाबाद 41, इक्लेस्टोनने 11 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 19 धावा जमविल्या. इंग्लंडच्या डावात 25 चौकार नोंदविले गेले. पाकतर्फे वहिदा अख्तर, सादिया इक्बाल यांनी प्रत्येकी 2 तर तुबा हसनने 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीसमोर पाकचा डाव 18.2 षटकात संपुष्टात आला. पाक संघातील सदाफ शमसने एकाकी लढत देत 24 चेंडूत 7 चौकारांसह 35, फिरोजाने 15 चेंडूत 3 चौकारांसह 17 तर फातिमा सनाने 20 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 16 धावा जमविल्या. इंग्लंतर्फे सारा ग्लेन आणि बेल प्रभावी गोलंदाज ठरले. ग्लेनने 12 धावांत 4 तर बेलने 22 धावांत 3, डिन व इक्लेस्टोन यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला. पाकच्या डावामध्ये 17 चौकार नोंदविले.
संक्षिप्त धावफलक - इंग्लंड 20 षटकात 6 बाद 163 (नाईट 49, अॅमी जोन्स 37, गिब्सन नाबाद 41, इक्लेस्टोन नाबाद 19, वहिदा अख्तर व सादिया इक्बाल प्रत्येकी 2 बळी, तुबा हसन 1-22), पाक 18.2 षटकात सर्व बाद 110 (सदाफ शमस 35, फिरोजा 17, मुनिबा अली 10, फातिमा सना 16, सारा ग्लेन 4-12, बेल 3-22, डिन 1-29, इक्लेस्टोन 1-17).