इंग्लंड महिला संघाचा 5 धावांनी विजय
मानधनाचे अर्धशतक वाया, डंक्ले ‘सामनावीर’
वृत्तसंस्था / लंडन
पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील येथे झालेल्या अटितटीच्या तिसऱ्या सामन्यात यजमान इंग्लंडने भारतीय महिला संघाचा केवळ 5 धावांनी पराभव करत भारताची या मालिकेतील आघाडी 2-1 अशी कमी केली. इंग्लंडतर्फे ‘सामनावीर’ सोफीया डंक्ले आणि डॅनी वेट हॉज यांनी शानदार अर्धशतके नोंदवित 137 धावांची शतकी भागिदारी केली. मात्र भारताच्या स्मृती मानधनाचे अर्धशतक वाया गेले.
या सामन्यातील विजयामुळे इंग्लंड मालिकेतील आपले आव्हान जिवंत ठेवले. या तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजीचा इंग्लंडच्या सलामीच्या जोडीने चांगलाच समाचार घेतला. डंक्ले आणि हॉज या जोडीने 15.2 षटकात 137 धावांची शतकी भागिदारी केली. मात्र इंग्लंडची ही जोडी फुटल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी प्रभावी गोलंदाजी करत त्यांचे 8 गडी 31 धावांत बाद केले. इंग्लंडचा डाव 20 षटकात 9 बाद 171 धावांवर समाप्त झाला. भारताचे क्षेत्ररक्षण गचाळ झाल्याने इंग्लंडला 171 धावांपर्यंत मजल मारता आली. डंक्लेला 43 धावांवर जीवदान मिळाले. तर वेट हॉजला डावातील 9 व्या षटकात भारताकडून दोन जीवदाने मिळाली. दिप्ती शर्माने डंक्लेला स्वत:च्याच गोलंदाजीवर झेलबाद केले. तिने 53 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह 75 धावा जमविल्या. यानंतर कॅप्सेला रे•ाrने 2 धावांवर बाद केले. वेट हॉज रे•ाrच्या गोलंदाजीवर झेलबाद झाली. तिने 42 चेंडूत 3 षटकार आणि 7 चौकारांसह 66 धावा जमविल्या. डंक्लेने 35 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह तर वेट हॉजने 34 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. इक्लेस्टोनने 1 षटकारासह 10 धावा केल्या. इंग्लंडच्या इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. भारतातर्फे दिप्ती शर्मा आणि अरुंधती रे•ाr यांनी प्रत्येकी 3, श्री चरणीने 43 धावांत 2 तर राधा यादवने 1 गडी बाद केला. इंग्लंडच्या डावामध्ये 5 षटकार आणि 15 चौकार नोंदविले गेले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना मानधना आणि शेफाली वर्मा यांनी भारताच्या डावाला चांगली सुरुवात करुन देताना 9 षटकात 85 धावांची भागिदारी केली. इक्लेस्टोनने शेफाली वर्माचा 47 धावांवर त्रिफळा उडविला. तिने 2 षटकार आणि 7 चौकार ठोकले. वर्मा बाद झाल्यानंतर मानधना आणि रॉड्रिग्ज यांनी 38 धावांची भागिदारी दुसऱ्या गड्यासाठी केली. रॉड्रिग्जने 15 चेंडूत 3 चौकारांसह 20 धावा जमविल्या. मानधनाने 49 चेंडूत 10 चौकारांसह 56 धावा झळकविल्या. ती 16 व्या षटकात बाद झाली. कर्णधार हरमनप्रित कौरने 17 चेंडूत 2 चौकारांसह 23 धावा केल्या. रिचा घोष मात्र केवळ 7 धावा जमवित तंबूत परतली. भारताला शेवटच्या षटकात विजयासाठी 12 धावांची जरुरी होती. इंग्लंडच्या स्कोफिल्डने अमनज्यौत कौरला जीवदान दिले. त्यामुळे भारताला शेवटच्या 4 चेंडूत 8 धावांची जरुरी होती. कर्णधार हरमनप्रित कौरने या षटकातील पाचव्या चेंडूवर केवळ दोन धावा घेतल्या. हरमनप्रित कौर या शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर षटकार खेचण्याच्या नादात झेलबाद झाल्याने भारताला हा सामना पाच धावांनी गमवावा लागला. कौर 17 चेंडूत 2 चौकारांसह 23 धावा जमविल्या. अमनज्योत कौर 1 चौकारासह 7 धावांवर नाबाद राहिली. भारताने 20 षटकात 5 बाद 166 धावा जमविल्या. इंग्लंडतर्फे फिलेरने 30 धावांत 2 तर बेल, वाँग आणि इक्लेस्टोन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. भारताच्या डावात 2 षटकार आणि 23 चौकार नोंदविले गेले. भारताने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 61 धावा जमविल्या. 10 षटकाअखेर भारताची स्थिती 1 बाद 97 अशी होती. मानधनाने आपले अर्धशतक 38 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने पूर्ण केले. आता या मालिकेतील चौथा सामना येत्या बुधवारी मँचेस्टर येथे खेळविला जाईल. भारतीय महिला क्रिकेट संघाला इंग्लंडमध्ये पहिला मालिका विजय जिंकण्यासाठी अद्याप वाट पहावी लागेल.
संक्षिप्त धावफलक: इंग्लंड 20 षटकात 9 बाद 171 (डंक्ले 75, डॅनी वेट हॉज 66, इक्लेस्टोन 10, अरुंधती रे•ाr आणि दिप्ती शर्मा प्रत्येकी 3 बळी, श्री चरणी 2-43, राधा यादव 1-1), भारत 20 षटकात 5 बाद 166 (स्मृती मानधना 56, शेफाली वर्मा 47, रॉड्रिग्ज 20, हरमनप्रित कौर 23, फिलेर 2-30, बेल, वाँग, इक्लेस्टोन प्रत्येकी 1 बळी)