इंग्लंड महिला संघाकडून विंडीजचा व्हाईटवॉश
अॅमी जोन्स मालिकावीर, सारा ग्लेन सामनावीर
वृत्तसंस्था/ लंडन
येथे झालेल्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत यजमान इंग्लंड महिला क्रिकेट संघाने विंडीजचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. विंडीजच्या अॅमी जोन्सला मालिकावीर तर इंग्लंडच्या सारा ग्लेनला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या मालिकेतील टाँटन येथे झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात यजमान इंग्लंडने विंडीजचा डकवर्थ लेव्हिस नियमाच्या आधारे 61 चेंडू बाकी ठेऊन 9 गड्यांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून विंडीजला प्रथम फलंदाजी दिली. विंडीज महिला संघाने 21 षटकात 8 बाद 106 धावा जमविल्या. त्यानंतर इंग्लंडने 10.5 षटकात 1 बाद 109 धावा जमवित हा सामना 9 गड्यांनी जिंकला.
पावसाचा अडथळा आल्याने पंचांनी हा सामना प्रत्येकी 21 षटकांचा खेळविण्याचा निर्णय घेतला होता. विंडीजच्या डावामध्ये जोसेफने 44 चेंडूत 5 चौकारांसह 34, कर्णधार कॅम्पबेलने 3 चौकारांसह 18, अॅलेनीने 18 चेंडूत 6 चौकारांसह 27 तर क्लेक्स्टोनने 4 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 11 धावा केल्या. इंग्लंडतर्फे सारा ग्लेनने 21 धावांत 3 तर आर्लोटने 15 धावांत 2 तसेच क्रॉस, फिलेर, चार्ली डीन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडने 10.5 षटकात 1 बाद 109 धावा जमवित हा सामना 9 गड्यांनी जिंकला. इंग्लंड संघाला डकवर्थ लेव्हिस नियमाच्या आधारे 21 षटकात विजयासाठी 106 धावांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. इंग्लंडची कर्णधार नॅट सिव्हेर ब्रंटने 33 चेंडूत 9 चौकारांसह नाबाद 57, कॅप्सेने 11 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 20, डंक्लेने 21 चेंडूत 4 चौकारांसह 26 धावा जमविल्या. डंक्ले आणि ब्रंट यांनी सलामीच्या गड्यासाठी 40 धावांची भागिदारी केली. त्यानंतर ब्रंट आणि कॅप्से यांनी दुसऱ्या गड्यासाठी अभेद्य 69 धावांची भागिदारी करत विजयांचे सोपस्कार पूर्ण केले.
गेल्या मार्चमध्ये हिथेर नाईटने इंग्लंड संघाच्या कर्णधार पदाचा त्याग केल्यानंतर नॅट सिव्हेर ब्रंटने पहिली मालिका जिंकली आहे. 30 सप्टेंबरपासून भारतात होणाऱ्या आयसीसीच्या महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपूर्वी इंग्लंडचा संघाने आतापासूनच पूर्व तयारीला प्रारंभ केला आहे. भारतामध्ये होणाऱ्या या स्पर्धेत 8 संघांचा समावेश असून त्यामध्ये यजमान भारत विद्यमान विजेता ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, लंका, पाक, बांगलादेश यांचा समावेश आहे. 2022 साली झालेल्या आयसीसीच्या महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
संक्षिप्त धावफलक - विंडीज 21 षटकात 8 बाद 106 (जोसेफ 34, कॅम्पबेल 18, अॅलेनी 27, क्लेक्स्टोन नाबाद 11, ग्लेन 3-21, आर्लोट 2-15, क्रॉस, फिलेर आणि डीन प्रत्येकी 1 बळी), इंग्लंड 10.5 षटकात 1 बाद 109 (डंक्ले 26, नॅट सिव्हेर ब्रंट नाबाद 57, कॅप्से नाबाद 20, रॅमरेक 1-31).