For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लॉर्ड्सवर इतिहास रचण्यासाठी इंग्लंड महिला संघ सज्ज

05:22 AM Jul 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
लॉर्ड्सवर इतिहास रचण्यासाठी इंग्लंड महिला संघ सज्ज
Advertisement

लॉर्ड्सवर इतिहास रचण्यासाठी इंग्लंड महिला संघ सज्ज

Advertisement

वृत्तसंस्था, लॉर्ड्स

रविवारी लॉर्ड्सवर होणाऱ्या अंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी इंग्लंडचा सामना करताना ऑस्ट्रेलिया आपल्या विक्रमी सातव्या महिला टी-20 विश्वचषक विजेतेपदासाठी प्रयत्नशील असेल. स्पर्धेतील हे दोनही अपराजित संघ या भव्य मंचावर इतिहास घडवण्याच्या तयारीत आहेत. सामन्याला रात्री 8.00 वाजता सुरुवात होणार आहे.

Advertisement

सहावेळा विजेतेपद पटकावलेला ऑस्ट्रेलियाचा संघ या प्रकारातील आपले वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल तर पहिली स्पर्धा जिंकल्यानंतर मायदेशात दोनदा महिला टी-20 विश्वचषक जिंकणारा पहिला देश बनण्याची इंग्लंडला आशा आहे. नवीन कर्णधार सोफी मोलिनक्सच्या नेतृत्वाखाली सहा सामन्यांत सहा विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजवर आठ गडी राखून विजय मिळवला आणि अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले. या वर्षाच्या सुरुवातीला कर्णधार अॅलिसा हिलीची जागा घेणाऱ्या मोलिनक्सने अशा संघाची उभारणी केली आहे जो केवळ काही मोजक्या स्टार खेळाडूंवर अवलंबून न राहता संघातील सर्व खेळाडूंच्या क्षमतेवर आधारीत आहे.

ऑस्ट्रेलियाचा मुख्य गटावर भर

एलिसा पेरी, बेथ मुनी, जॉर्जिया वेअरहॅम आणि अॅश्ले गार्डनर यांनी स्पर्धेच्या विविध टप्प्यांवर महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विशेषत: पेरीने सहा सामन्यांत तीन वेळा सामनावीर पुरस्कार पटकावून ऑस्ट्रेलियासाठी एक अजेय शक्ती म्हणून स्वत:ला सिद्ध केले आहे. उपांत्य सामन्यानंतर गार्डनर म्हणाली, एका बाबतीत आम्हाला फायदा असा आहे की, आम्ही अनेक अंतिम सामने खेळलो आहोत आणि आमच्याकडे असा एक मुख्य खेळाडूंचा गट आहे ज्यांनी अनेक अंतिम सामने खेळले आहेत. त्यामुळे त्या अनुभवाचा योग्य वापर करणे महत्त्वाचे ठरेल. आम्ही केवळ एका किंवा दोन व्यक्तींवर अवलंबून नाही, त्यामुळे अशा महत्त्वाच्या क्षणांमध्ये वेगवेगळे खेळाडू जबाबदारीस्वीकारुन पुढे नेत आहेत.

इंग्लंडकडे मोमेंटम

इंग्लंडचा संघ आत्मविश्वास आणि विजयाच्या लयीसह अंतिम सामन्यात उतरत आहे. डॅनी व्याट हॉज सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आघाडीवर आहे तर सोफी एक्लेस्टोन आणि चार्ली डीन सर्वाधिक बळी घेणाऱ्या पहिल्या सहा गोलंदाजांमध्ये आहेत. द. आफ्रिकेविरूद्ध उपांत्य फेरीत मिळवलेल्या 40 धावांच्या दणदणीत विजयाने त्यांच्या उत्कृष्ट फॉर्मची साक्ष दिली आहे. ज्याच्या जोरावर ते 2018 नंतर पहिल्यांदाच टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचले आहेत. तरीही, ऑस्ट्रेलिया हेच त्यांच्यासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. जुलै 2023 पासून इंग्लंडने कोणत्याही प्रकारात ऑस्ट्रेलियाचा पराभव केलेला नाही. त्यांना सलग आठ पराभवांचा सामना करावा लागला आहे. ज्यामध्ये गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या अॅशेस मालिकेत झालेला व्हाईटवॉश देखील समाविष्ट आहे.

या स्पर्धेत आम्ही ज्या पद्धतीने आमचा खेळ साकारला आहे, ती एक सुनियोजित रणनीती आहे आणि त्याच जोरावर आम्ही त्यांना पराभूत करू शकतो, असे उपांत्य फेरीतील विजयानतंर कर्णधार नॅट सिव्हर ब्रंटने सांगितले. तिने या स्पर्धेदरम्यान पायाच्या स्नायुंच्या दुखापतीवर मात केली होती. ऑस्ट्रेलिया हा जागतिक दर्जाचा संघ आहे ज्याने गेल्या काही वर्षांत प्रचंड यश मिळवले आहे. परंतु त्यांच्याशी खंबीरपणे आणि तोडीस तोड सामना करणे हाच विजयाचा मार्ग आहे. या सामन्यातील विजयामुळे महिला क्रिकेटमधील ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व अधिक दृढ होईल तर दुसरीकडे इंग्लंडकडे आपल्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध विजयाचा दुष्काळ संपवण्याची आणि 17 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर दुसरे टी-20 विश्वचषक विजेतेपद पटकावण्याची संधी असेल.

Advertisement
Tags :

.