For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दमदार विजयासह इंग्लंड महिला अंतिम फेरीत

06:26 AM Jul 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
दमदार विजयासह इंग्लंड महिला अंतिम फेरीत
Advertisement

महिला टी-20 विश्वचषक स्पर्धा : द. आफ्रिका महिलांचा 40 धावांनी पराभव

Advertisement

वृत्तसंस्था, लंडन

2026 च्या आयसीसी महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी येथे खेळविण्यात आलेल्या उपांत्य सामन्यात सामनावीर आणि कर्णधार नॅट सिव्हर-ब्रंटच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर यजमान इंग्लंडने द. आफ्रिकेचा 40 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. आता इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जेतेपदासाठी लढत रविवारी 5 जुलै रोजी लॉर्ड्स मैदानावर खेळविली जाणार आहे.  या स्पर्धेत 2010 नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन संघांनी अपराजित राहून अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आहे.

Advertisement

या उपांत्य सामन्यात यजमान इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 बाद 169 धावा जमविल्या. त्यानंतर इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीसमोर द. आफ्रिकेने 20 षटकांत 8 बाद 129 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांचे या स्पर्धेतील आव्हान उपांत्य फेरीतच समाप्त झाले. द. आफ्रिकेचा महिला संघ पुन्हा चोकर्स ठरला.

इंग्लंडच्या डावाला सुरुवात झाल्यानंतर द. आफ्रिकेच्या इस्माईलने दुसऱ्याच षटकातील पहिल्या चेंडूवर जोन्सला 2 धावांवर झेलबाद केले. त्यानंतर मारिझान कॅपने डॅनी वॅट हॉजचा तिसऱ्या षटकात त्रिफळा उडविला. हॉजने 9 चेंडूत 2 चौकारांसह 12 धावा जमविल्या. शबनिम इस्माईलने इंग्लंडला आणखी एक धक्का देताना अॅलिस कॅप्सेला केवळ 1 धावेवर पायचीत केले. इंग्लंडची स्थिती यावेळी 3 बाद 23 अशी केविलवाणी होती.

शतकी भागिदारी

कर्णधार ब्रंट आणि हेदर नाईट या जोडीने दमदार फलंदाजी करत आपल्या संघाला सुस्थितीत नेताना चौथ्या गड्यासाठी 90 चेंडूत 133 धावांची शतकी भागिदारी केली. महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बाद फेरीच्या सामन्यातील ही सर्वोच्च भागिदारी ठरली आहे. ब्रंटने 47 चेंडूत 1 षटकार आणि 11 चौकारांसह 75 तर नाईटने 47 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 58 धावा झळकविल्या. ब्रंटने 35 चेंडूत 9 चौकारांसह तर नाईटने 42 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. इंग्लंडची कर्णधार ब्रंटला आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात खेळताना स्नायु दुखापत झाली होती. त्यामुळे तिला या स्पर्धेतील शेवटच्या तीन सामन्यांत खेळता आले नव्हते. इंग्लंडच्या डावातील 19 व्या षटकांत द. आफ्रिकेच्या मलाबाने ब्रंटला झेलबाद केले. तर याच षटकातील चौथ्या चेंडूवर मलाबाने नाईटला झेलबाद केले. इंग्लंडच्या डावामध्ये 2 षटकार आणि 19 चौकार नोंदविले गेले. इंग्लंडने पॉवरप्ले दरम्यानच्या पहिल्या 6 षटकांतन 35 धावा जमविताना 3 गडी गमविले. 14 षटकाअखेर इंग्लंडने 3 बाद 113 धावांपर्यंत मजल मारली होती. द. आफ्रिकेतर्फे शबनिम इस्माईल आणि मलाबा यांनी प्रत्येकी 2 तर कॅपने 1 गडी बाद केला.

द. आफ्रिकेच्या शबनिम इस्माईलने महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बळींचे अर्धशतक पूर्ण केले. अशी कामगिरी करणारी ही द. आफ्रिकेची पहिली गोलंदाज आहे. द. आफ्रिकेच्या कॅपने हॉजचा त्रिफळा उडविला. हॉजने महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक धावा जमविल्या आहेत. तसेच कर्णधार नॅट सिव्हर ब्रंट आणि नाईट या इंग्लंडच्या फलंदाजांनी आतापर्यंत किमान 600 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

प्रत्युत्तरादाखल खेळताना कर्णधार वूलव्हार्ट आणि ब्रिट्स या सलामीच्या जोडीने 34 चेंडूत 43 धावांची भागिदारी करत द. आफ्रिकेच्या डावाला सावध सुरुवात करून दिली. पण यानंतर इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीसमोर त्यांचा डाव कोलमडला. स्मिथने वूलव्हार्टला झेलबाद केले. तिने 3 चौकारांसह 17 धावा केल्या. केम्पने डर्कसनला 3 धावांवर तंबूचा रस्ता दाखविला. डीनने कॅपला 5 धावांवर बाद केले. सुने लूसने 13 चेंडूत 1 चौकारासह 11 धावा जमविल्या. डी क्लर्कने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून 14 चेंडूत 1 चौकारासह नाबाद 14 धावा केल्या. ब्रिट्सने मात्र 45 चेंडूत 6 चौकारांसह 51 धावा झळकविल्या. ती पाचव्या गड्याच्या रुपात बाद झाली. त्यानंतर द. आफ्रिकेच्या तळाच्या फलंदाजांना अधिक धावा जमविता आल्या नाहीत. ट्रायॉनने 2 चौकारांसह 12 धावा केल्या. द. आफ्रिकेच्या डावात 14 चौकार नोंदविले गेले. इंग्लंडतर्फे लॉरेन बेल आणि चार्ली डीन यांनी प्रत्येकी 2 तर स्मिथ, इक्लेस्टोन आणि केम्प यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला. द. आफ्रिकेने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकांत 43 धावा जमविताना 1 गडी गमविला. 14 षटकाअखेर द. आफ्रिकेने 4 बाद 91 धावांपर्यंत मजल मारली होती. द. आफ्रिकेच्या तुनलेत इंग्लंडच्या गोलंदाजांनी अधिक अचूक गोलंदाजी केल्याने त्यांना हा सामना सहजपणे जिंकता आला.

संक्षिप्त धावफलक : इंग्लंड 20 षटकांत 5 बाद 169 (नॅट सिव्हर ब्रंट 75, नाईट 58, डॅनी वॅट हॉज 12, अवांतर 14, शबनिम इस्माईल व मलाबा प्रत्येकी 2 बळी, कॅप 1-16), द. आफ्रिका 20 षटकांत 8 बाद 129 (ब्रिट्स 51, डी. क्लर्क नाबाद 14, ट्रायॉन 12, लूस 11, वूलव्हार्ट 17, अवांतर 9, लॉरेन बेल व चार्ली डीन प्रत्येकी 2 बळी, स्मिथ, इक्लेस्टोन व केम्प प्रत्येकी 1 बळी).

Advertisement
Tags :

.