इंग्लंडचा न्यूझीलंडवर मालिका विजय
‘मालिकावीर’, डॅनी गिब्सन ‘सामनावीर’
वृत्तसंस्था, होवे
तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत यजमान इंग्लंडने न्यूझीलंड महिला संघाचा 2-1 अशा फरकाने पराभव केला. या मालिकेतील खेळविण्यात आलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात इंग्लंडने किवीजचा 37 चेंडू बाकी ठेवून 7 गड्यांनी पराभव केला. डॅनी गिब्सनला ‘सामनावीर’ तर लिन्से स्मिथला ‘मालिकावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण इंग्लंडच्या अचूक गोलंदाजीसमोर त्यांचा डाव 19.1 षटकांत 80 धावांत आटोपला. त्यानंतर इंग्लंडने 13.5 षटकांत 3 बाद 81 धावा जमवित सामना आणि मालिका जिंकली.
न्यूझीलंडच्या डावामध्ये केवळ तीन फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली. जेस केरने 27 चेंडूत 2 चौकारांसह 20 तर इसाबेला गेझने 13 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 17 तर मॅडी ग्रीनने 18 चेंडूत 1 चौकारांसह 14 धावा जमविल्या. न्यूझीलंडला 10 अवांतर धावा मिळाल्या. न्यूझीलंडने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकांत 29 धावा जमविताना 2 गडी गमविले. 10 षटकाअखेर त्यांची स्थिती 6 बाद 37 अशी होती. न्यूझीलंडचे अर्धशतक 79 चेंडूत नोंदविले गेले. त्यांच्या डावात 1 षटकार आणि 6 चौकार नोंदविले गेले. इंग्लंडतर्फे चार्ली डीन आणि डॅनी गिब्सन यांनी प्रत्येकी 3 तर लिन्से स्मिथने 2 तसेच वाँग आणि इक्लेस्टोन यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडच्या डावामध्ये सलामीच्या सोफिया डंक्लेने 21 चेंडूत 4 चौकारांसह 22, बाऊचरने 29 चेंडूत 1 चौकारांसह 19, नाईटने 22 चेंडूत 2 चौकारांसह 18 धावा केल्या. इंग्लंडला 12 अवांतर धावा मिळाल्या. इंग्लंडच्या डावात 8 चौकार नोंदविले गेले. इंग्लंडने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकांत 36 धावा जमविताना 2 गडी गमविले. इंग्लंडचे अर्धशतक 56 चेंडूत नोंदविले गेले. 10 षटकाअखेर इंग्लंडने 2 बाद 59 धावा केल्या होत्या.
संक्षिप्त धावफलक: न्यूझीलंड : 19.1 षटकांत सर्वबाद 80 (जेस केर 20, गेझ 17, ग्रीन 14, अवांतर 10, चार्ली डीन व डॅनी गिब्सन प्रत्येकी 3 बळी, स्मिथ 2-15, वाँग आणि इक्लेस्टोन प्रत्येकी 1 बळी), इंग्लंड 13.5 षटकांत 3 बाद 81 (डंक्ले 22, बाऊचर नाबाद 19, नाईट 18, कॅप्से 3, केम नाबाद 7, अवांतर 12, पटेल, इलिंग आणि मेली केर प्रत्येकी 1 बळी).