इंग्लंडचा मुकाबला आज पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाशी
ऑस्ट्रेलिया/ वृत्तसंस्था
ब्रिजटाउन (बार्बाडोस)
गतविजेता इंग्लंड आज शनिवारी येथे ‘ब’ गटातील सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाशी सामना करताना गोलंदाजीत सुधारणा घडविण्याचा आणि टी-20 विश्वचषकातील मोहीम धडाक्यात सुरू करण्याचा प्रयत्न करेल. स्कॉटलंडविऊद्ध इंग्लंडचा सलामीचा सामना पावसात वाहून गेला, ज्यामुळे संघांना प्रत्येकी एक गुण वाटून घ्यावा लागला. त्यापूर्वी स्कॉटलंडने 10 षटकात बिनबाद 90 धावा केल्या होत्या.
पण त्या 60 चेंडूंनीही इंग्लंडला गोलंदाजीमध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचे दाखवून दिले. स्कॉटिश सलामीवीर जॉर्ज मुन्से आणि मायकेल जोन्स यांनी इंग्लंडच्या सर्व गोलंदाजांविऊद्ध मुक्तपणे धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या संघात तर किती तरी जास्त घातक फटकेबाज आहेत. डेव्हिड वॉर्नर आणि मार्कस स्टॉइनिस यांनी स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात ओमानला पराभूत करताना ते किती नुकसान करू शकतात हे दाखवून दिले आहे.
इंग्लंडच्या गोलंदाजीत स्कॉटलंडविऊद्ध दोन षटकांत 12 धावा दिलेल्या आणि पुनरागमन करणाऱ्या जोफ्रा आर्चरवर पुन्हा एकदा बरेच लक्ष असेल. त्याचबरोबर आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केलेल्या कर्णधार जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लिश फलंदाजांना ऑसी माऱ्यावर एकजुटीने हल्ला करावा लागेल. आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादतर्फे समाधानकारक कामगिरी केलेल्या पॅट कमिन्सशिवाय ओमानविऊद्ध खेळताना ऑस्ट्रेलियन गोलंदाज खूप प्रभावी दिसले. त्या सामन्यात नॅथन एलिस कमिन्सच्या ऐवजी खेळला. परंतु ऑस्ट्रेलिया इंग्लंडसारख्या अधिक मजबूत प्रतिस्पर्ध्याविऊद्ध या प्रमुख वेगवान गोलंदाजाला परत आणू शकेल.
ऑस्ट्रेलियाची फलंदाजी स्थिरावलेली दिसत असली, तरी ग्लेन मॅक्सवेल हा कमकुवत दुवा आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरतर्फे आयपीएलमध्ये खेळताना निराशाजनक कामगिरी केलेला मॅक्सवेल ओमानविऊद्ध पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. ऑस्ट्रेलियाची इच्छा मॅक्सवेल लवकरात लवकर त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये परतावा अशीच असेल. त्यादृष्टीने इंग्लंडविऊद्धचा सामना त्याला एक परिपूर्ण संधी देईल.
सामन्याची वेळ : रात्री 10.30 वा. (भारतीय वेळेनुसार)