न्यूझीलंडकडून इंग्लंडचा व्हाईटवॉश
डॅरियल मिचेल ‘मालिकावीर’, ब्लेअर टिकनेर ‘सामनावीर’
वृत्तसंस्था / वेलिंग्टन
यजमान न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत इंग्लंडचा 3-0 अशा फरकाने एकतर्फी पराभव केला. या मालिकेतील झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडने इंगलंडचा दोन गड्यांनी पराभव केला. न्यूझीलंडच्या डॅरियल मिचेलची ‘मालिकावीर’ तर ब्लेअर टिकनेरची ‘सामनावीर’ म्हणून निवड केली. या शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी दिली. इंग्लंडचा डाव 40.2 षटकात 222 धावांवर आटोपला. त्यानंतर न्यूझीलंडने 44.4 षटकात 8 बाद 226 धावा जमवित हा सामना 2 गडी राखत जिंकला.
इंग्लंडच्या डावामध्ये ओव्हरटनने एकाकी लढत देत 62 चेंडूत 2 षटकार आणि 10 चौकारांसह 68, कार्सेने 30 चेंडूत 4 षटकार आणि 1 चौकारांसह 36, जोस बटलरने 56 चेंडूत 7 चौकारांसह 38, सॅम करणने 3 चौकारांसह 17 तर आर्चरने 2 चौकारांसह 16 धावा जमविल्या. न्यूझीलंडतर्फे ब्लेअर टिकनेर सर्वात प्रभावी गोलंदाज ठरला. त्याने 64 धावांत 4 गडी तर डफीने 56 धावांत 3, फोकेसने 27 धावांत 2 व सँटेनरने 34 धावांत 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडच्या डावात रचिन रविंद्रनने 37 चेंडूत 7 चौकारांसह 46 तर कॉन्वेने 44 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 34 धावा जमविल्या. या जोडीने सलामीच्या गड्यासाठी 78 धावांची भागिदारी केली. डॅरियल मिचेलने 68 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 44 धावा केल्या. लेथमने 1 चौकारासह 10, ब्रेसवेलने 2 चौकारांसह 13 तर कर्णधार सँटेनरने 29 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 27 धावा झळकविल्या. फोकेसने 24 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 14 तर टिकनेरने 2 चौकारांसह नाबाद 18 धावा जमवित विजयाचे सोपस्कर पूर्ण केले. इंग्लंडतर्फे ओव्हरटन आणि सॅम करणे यांनी प्रत्येकी 2 तर कार्से व आदिल रशीद यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. न्यूझीलंडचे दोन फलंदाज धावचीत झाले. इंग्लंडला ही वनडे मालिका एकतर्फी गमवावी लागल्याने आता आगामी होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅशेस मालिकेत त्यांच्यावर अधिकच दडपण राहील. या मालिकेत मिचेलने 178 धावा जमविल्या. ब्लेअरने या सामन्यात 64 धावांत 4 तर फलंदाजीत 20 चेंडूत नाबाद 18 धावा जमवित आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
संक्षिप्त धावफलक: इंग्लंड 40.2 षटकात सर्वबाद 222 (ओव्हरटन 68, बटरल 38, कार्से 36, सॅम करण 17, आर्चर 16, अवांतर 14, टिकनेर 4-64, डफी 3-56, फोकेस 2-27, सँटेनर 1-34), न्यूझीलंड 44.4 षटकात 8 बाद 226 (रचिन रविंद्र 46, डॅरियल मिचेल 44, कॉन्वे 34, सँटेनर 27, टिकनेर नाबाद 18, अवांतर 17, ओव्हरटन व सॅम करण प्रत्येकी 2 बळी, कार्से व आदिल रशीद प्रत्येकी 1 बळी).