इंग्लंडची कसोटी मालिकेत विजयी आघाडी
दुसऱ्या कसोटीत पाकचा 194 धावांनी पराभव, सामनावीर रॉबिन्सन-आर्चर ठरले पाकचे कर्दनकाळ, सौद शकीलची एकाकी लढत
वृत्तसंस्था, लंडन
सामनावीर ओली रॉबिन्सन तसेच जोफ्रा आर्चर आणि टंग या इंग्लंडच्या वेगवान त्रिकुटाच्या कामगिरीच्या जोरावर यजमान इंग्लंडने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकवर 2-0 अशी विजयी आघाडी मिळविली. लॉर्ड्सच्या मैदानावर झालेल्या दुसऱ्या कसोटीत खेळाच्या चौथ्या दिवशीच इंग्लंडने पाकचा 194 धावांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात रॉबिन्सनने 8 गडी बाद केले.
या दुसऱ्या कसोटीत वारंवार पावसाचा अडथळा येऊनही इंग्लंडने चौथ्या दिवशीच मालिका विजयावर शिक्कमोर्तब केला. इंग्लंडने पहिल्या डावात 290 धावा जमविल्यानंतर पाकचा पहिला डाव 110 धावांत आटोपला. इंग्लंडने पहिल्या डावात 180 धावांची भक्कम आघाडी घेतली. त्यानंतर इंग्लंडचा दुसरा डाव 208 धावांत आटोपला. पाकच्या मोहम्मद अब्बासने पाच गडी तर मोहम्मद अली आणि खुर्रम शेहजाद यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात लॉरेन्सचे अर्धशतक महत्त्वाचे ठरले.
इंग्लंकडून पाकला विजयासाठी 389 धावांचे कठीण आव्हान मिळाले होते, पण चौथ्या दिवशीच पाकचा दुसरा डाव 50.5 षटकांत 194 धावांत आटोपला. पाकने उपाहारापर्यंतच्या पहिल्या सत्रात 17 षटकांत 3 बाद 53 धावा जमविल्या होत्या. त्यानंतर चहापानापर्यंतच्या दुसऱ्या सत्रात साऊद शकीलच्या चिवट खेळीमुळे पाकने या सत्रात केवळ दोन गडी गमविताना 87 धावांची भर घातली. मात्र साऊद शकील खेळपट्टीवर असेपर्यंत इंग्लंडला विजयासाठी वाट पहावी लागली होती. पण टंगने त्याला सातव्या गड्याच्या रुपात बाद केल्यानंतर इंग्लंडला विजय हस्तगत करण्यासाठी अधिक कालावधी लागला नाही. साऊद शकीलने 122 चेंडूत 2 षटकार आणि 13 चौकारांसह 97 धावा काढल्या. शकीलचे शतक केवळ तीन धावांनी हुकले. पाकच्या दुसऱ्या डावात सलामीच्या शान मसुदने दोन चौकारांसह 26, अली उस्मानने 2 चौकारांसह 16 तर मोहम्मद अब्बासने 1 षटकारासह नाबाद 13 धावा जमविल्या. इंग्लंडतर्फे रॉबिन्सनने 24 धावांत 4 तर टंगने 46 धावांत 3 तर आर्चरने 73 धावांत 2 बळी मिळविले. रॉबिन्सनने या सामन्यात 35 धावांत 8 गडी बाद केले. या मालिकेतील पहिल्या सामन्यातही रॉबिन्सनने 80 धावांत 8 बळी मिळविले होते. त्यामुळे रॉबिन्सन, आर्चर आणि टंग हे वेगवान त्रिकुट पाकचे कर्दनकाळ ठरले. कर्णधार रुटने रॉबिन्सन, आर्चर आणि टंग या वेगवान गोलंदाजांचे खास कौतुक केले.
कर्णधार रूटचा नवा विक्रम
इंग्लंड संघाचे नेतृत्व करताना जो रूट हा कसोटी क्रिकेटमध्ये आशियाई संघाविरुद्ध खेळताना सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. रुटच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने दुसरी कसोटी जिंकली. 2017 ते 2022 या कालावधीत इंग्लंडचे नेतृत्व करताना आशियाई खंडातील संघाविरुद्ध 25 सामन्यांपैकी 15 सामने जिंकण्याचा विक्रम रूटने केला आहे. इंग्लंडतर्फे अशी कामगिरी करणारा रूट हा पहिला कर्णधार आहे. त्यानंतर इंग्लंडच्या अँड्य्रु स्ट्रॉसने 22 पैकी 14 सामने जिंकत दुसरे स्थान तर अॅलिस्टर कुकने 30 पैकी 12 सामने जिंकत तिसरे स्थान तसेच नासीर हुसेन आणि बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी 7 सामने जिंकले आहेत.
संक्षिप्त धावफलक : इंग्लंड प. डाव 290, पाक प. डाव 110, इंग्लंड दु. डाव 208, पाक दु. डाव 50.5 षटकांत सर्वबाद 194 (शान मसुद 26, साऊद शकील 97, अली उस्मान 16, मोहम्मद अब्बास नाबाद 13, अवांतर 12, रॉबिन्सन 4-24, आर्चर 2-73, टंग 3-46).