For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्कॉटलंडविरुद्धच्या लढतीने आज इंग्लंडची सलामी

06:49 AM Jun 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
स्कॉटलंडविरुद्धच्या लढतीने आज इंग्लंडची सलामी
Advertisement

वृत्तसंस्था/ ब्रिजटाऊन (बार्बाडोस)

Advertisement

पावसामुळे तयारीपासून वंचित झालेला गतविजेता इंग्लंड आज मंगळवारी येथे त्यांच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात स्कॉटलंडशी सामना करणार असून सुरुवातीपासूनच साऱ्या गोष्टी जाग्यावर घालण्याकडे त्यांचा कल राहील.

वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या पुनरागमनामुळे इंग्लिश गोलंदाजीच्या आक्रमणात भर पडली असून फिल सॉल्ट इंडियन प्रीमियर लीगमधील आपला फॉर्म कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. पाकिस्तानविऊद्धच्या इंग्लंडच्या घरच्या मैदानावरील चार सामन्यांच्या टी-20 मालिकेत पावसाने व्यत्यय आणला. परंतु इंग्लंडकडे अजूनही तिसऱ्यांदा विजेतेपद मिळविण्याच्या दृष्टीने प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जाईल.

Advertisement

‘टी-20’मध्ये स्कॉटलंडशी इंग्लंडची गाठ पडण्याची ही पहिलीच खेप असेल. जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंडचे पारडे केन्सिंग्टन ओव्हलमधील या सामन्यात स्वाभाविकपणे जड असेल. ‘ब’ गटात स्कॉटलंडव्यतिरिक्त इंग्लंडचे पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलिया, नामिबिया व ओमान यांचा समावेश आहे. ‘सुपर एट’मध्ये पोहोचण्यासाठी संघांना गटातील पहिल्या दोनमध्ये स्थान मिळवावे लागेल.

2022 मध्ये मेलबर्नमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानवर पाच गडी राखून विजय मिळविला होता. त्यानंतर मर्यादित षटकांच्या सामन्यातील त्यांची वाटचाल सोपी राहिलेली नाही. ऑस्ट्रेलियातील यशाच्या एका वर्षानंतर बटलरच्या संघाची भारतातील विश्वचषक स्पर्धेतील मोहीम दयनीय राहिली. अफगाणिस्तानविऊद्धच्या वेदनादायक पराभवासह त्यांनी नऊपैकी सहा सामने गमावून सातवे स्थान मिळवले. त्याशिवाय 50 षटकांच्या आणि 20 षटकांच्या अशा दोन्ही प्रकारात त्यांना वेस्ट इंडिजकडून पराभूत व्हावे लागले. या पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या पाकिस्तानविऊद्धच्या मालिकेत 2-0 ने विजय  मिळविलेला असल्याने त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळालेला असेल.

इंग्लंडने पॉल कॉलिंगवूडच्या नेतृत्वाखाली 2010 मध्ये केन्सिंग्टन ओव्हलवरच पहिला टी-20 विश्वचषक जिंकला होता. स्कॉटलंड कागदावर त्यांच्या ताकदीशी जुळत नाही, तरीही ते युरोपियन पात्रता फेरीत धडक मारल्यानंतर मुख्य स्पर्धेत छाप पाडण्याचा प्रयत्न करतील. स्कॉटलंडने पात्रता फेरीतील त्यांचे सर्व सहा सामने जिंकून क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले होते. त्यामुळे त्यांना मुख्य स्पर्धेत स्थान मिळालेले आहे.

सामन्याची वेळ : भारतीय वेळेनुसार रात्री 8 वा.

Advertisement
Tags :

.