इंग्लंडची मोठ्या विजयाकडे वाटचाल
पाक पुन्हा पराभवाच्या छायेत : एकाकी लढत देणाऱ्या सौद शकीलचे अर्धशतक
वृत्तसंस्था, लंडन
लॉर्ड्स मैदानावर सुरु असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीतील रविवारी खेळाच्या चौथ्या दिवशी यजमान इंग्लंडचा संघ पुन्हा मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. शेवटची बातमी हाती आली त्यावेळी पाकने दुसऱ्या डावात 5 बाद 133 धावा जमविल्या होत्या. पाकचा संघ अद्याप 254 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 5 गडी खेळावयाचे आहेत. सौद शकील 72 धावांवर खेळत असून इंग्लंडच्या रॉबिन्सनने 4 गडी बाद केले होते.
या कसोटीत इंग्लंडने पहिल्या डावात 290 धावा जमविल्यानंतर पाकचा पहिला डाव 110 धावांत आटोपला. इंग्लंडने पहिल्या डावात पाकवर 180 धावांची भक्कम आघाडी मिळवली. त्यानंतर इंग्लंडने शनिवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर दुसऱ्या डावात 7 बाद 177 धावा जमविल्या होत्या. रविवारी खेळाला प्रारंभ झाल्यानंतर इंग्लंडचा दुसरा डाव 208 धावांत आटोपला. इंग्लंडच्या शेवटच्या 3 गड्यांनी 31 धावांची भर घातली. लॉरेन्सने 54, गे ने 31, ब्रुकने 34, रुटने 24 तर टंगने 12 धावा केल्या. पाकतर्फे मोहम्मद अब्बास सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 57 धावांत 5 गडी बाद केले. खुर्रम शेहजाद आणि मोहम्मद अली यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले. इंग्लंडने पाकला विजयासाठी 389 धावांचे कठीण आव्हान दिले.
रॉबिन्सनचा पुन्हा भेदक मारा
रविवारी खेळाच्या चौथ्या दिवशी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज रॉबिन्सनच्या भेदक माऱ्यासमोर पाकचे फलंदाज पुन्हा गडगडले. उपाहारापर्यंतच्या सत्रात पाकने 17 षटकात 3 गडी गमविताना 53 धावा जमविल्या होत्या. सलामीचा अझान अवैस रॉबिन्सनच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्याने 6 धावा जमविल्या. रॉबिन्सनने आपल्या या षटकातील शेवटच्या चेंडूवर शफीकचा खाते उघडण्यापूर्वी त्रिफळा उडविला. आर्चरने कर्णधार बाबर आझमला 6 धावावर झेलबाद केले.
शान मसूद आणि सौद शकील यांनी चौथ्या गड्यासाठी 97 धावांची भागिदारी केली. रॉबिन्सनने खेळाच्या दुसऱ्या सत्रात शान मसूदला पायचीत केले. त्याने 72 चेंडूत 2 चौकारांसह 26 धावा जमविल्या. चहापानापूर्वी रॉबिन्सनने पाकला आणखी एक धक्का देताना रिझवानला एका धावेवर पायचीत केले. पाकची स्थिती यावेळी 5 बाद 115 अशी केविलवाणी झाली होती. सौद शकीलने 54 चेंडूत 9 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. शकील 11 चौकारांसह 72 तर अली उस्मान 1 चौकारासह 11 धावांवर खेळत होता. इंग्लंडतर्फे रॉबिन्सनने 4 तर आर्चरने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक - इंग्लंड प. डाव 290, पाक प. डाव 110, इंग्लंड दु. डाव 54.2 षटकात सर्वबाद 208 (लॉरेन्स 54, ब्रुक 34, गे 31, रुट 24, टंग 12, कॉक्स 11, अवांतर 17, मोहम्मद अब्बास 5-57, खुर्रम शेहजाद व मोहम्मद अली प्रत्येकी 2 बळी), पाक दु. डाव 37.4 षटकात 5 बाद 133 (सौद शकील खेळत आहे 72, अली उस्मान खेळत आहे 11, शान मसूद 26, रॉबिन्सन 4-23, आर्चर 1-45). धावफलक अपूर्ण.