इंग्लंडचा वेगवान गोलंदाज गस अॅटकिन्सन जखमी
भारताविरुद्ध पहिल्या सामन्याला मुकण्याची शक्यता
वृत्तसंस्था/लंडन
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेपूर्वी इंग्लंडला मोठा झटका बसला आहे. संघाचा वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू गस अॅटकिन्सन दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यातून बाहेर पडू शकतो. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे तो पहिल्या सामन्यात खेळू शकणार नसल्याची माहिती इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोलंदाज गस अॅटकिन्सनच्या उजव्या मांडीच्या स्नायूमध्ये ताण जाणवत असल्याने भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत खेळणे संशयास्पद मानले जात आहे. गेल्या महिन्यात झिम्बाब्वेमध्ये झालेल्या कसोटी सामन्यादरम्यान 27 वर्षीय अॅटकिन्सनला दुखापत झाली होती. ज्यामुळे तो वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेत खेळू शकला नव्हता. तथापि, इंग्लंडने वेस्ट इंडिजचा 3-0 असा पराभव करून मालिका सहज आपल्या खिशात टाकली होती. अॅटकिन्सन तंदुरुस्त नसेल तर इंग्लंडसाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. कारण मार्क वूड आणि ऑली स्टोन, जोफ्रा आर्चर हे स्टार खेळाडू आधीच जखमी आहेत. इंग्लंडमध्ये होणाऱ्या महत्त्वाच्या मालिकेपूर्वी इंग्लंडचे चार खेळाडू जखमी झालेले आहेत. अशा परिस्थितीत इंग्लंड कोणती रणनीती आखणार याकडे लक्ष द्यावे लागेल. भारत आणि इंग्लंडमधील पाच कसोटी सामन्यांची मालिका 20 जूनपासून सुरू होणार आहे. पहिला सामना लीड्समध्ये सुरू होईल.