इंग्लंडचा विंडीजवर 21 धावांनी विजय
टी-20 मालिका, लियाम डॉसन ‘सामनावीर’
वृत्तसंस्था / चेस्टर ली स्ट्रीट
तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत यजमान इंग्लंडने विजयी सलामी देताना पहिल्या सामन्यात विंडीजचा 21 धावांनी पराभव केला. या सामन्यात इंग्लंडच्या लियाम डॉसनला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. या सामन्यात इंग्लंडतर्फे बटलरचे शतक केवळ 4 धावांनी हुकले. इंग्लंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 188 धावा जमविल्या. त्यानंतर विंडीजने 20 षटकात 9 बाद 167 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना 21 धावांनी गमवावा लागला.
इंग्लंडच्या डावामध्ये जोस बटलरने 59 चेंडूत 4 षटकार आणि 6 चौकारांसह 96 धावा झोडपल्या. सलामीच्या जेमी स्मिथने 20 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 38 धावा केल्या. बेथेलने 23 चेंडूत 1 षटकारासह नाबाद 23 धावांचे योगदान दिले. स्मिथ आणि बटलर यांनी दुसऱ्या गड्यासाठी 79 धावांची भागिदारी केली. जॅक्स 9 धावांवर धावचीत झाला. कर्णधार ब्रुकने 1 चौकारासह 6 तर बँटनने 3 धावा केल्या. डकेट 1 धावेवर बाद झाला. इंग्लंडच्या डावात 7 षटकार आणि 12 चौकार नोंदविले गेले. इंग्लंडने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 78 धावा जमविताना 1 गडी गमविला. बटलरने 25 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारासह अर्धशतक झळकविले. विंडीजतर्फे शेफर्डने 33 धावांत 2 तर जोसेफ, रसेल, चेस यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडच्या अचूक गोलंदाजीसमोर विंडीजच्या फलंदाजांना फटकेबाजी करता आली नाही. सलामीच्या लेवीसने 23 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारासह 39, चाल्सने 15 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 18, कर्णधार हॉपने 3 धावा, चेसने 20 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 24, रुदरफोर्डने 2,पॉवेलने 2 चौकारांसह 13, रसेलने 1 षटकारासह 15, सेफर्डने 2 चौकारांसह 16, होल्डरने 2 चौकारांसह नाबाद 16 धावा केल्या. इंग्लंडतर्फे लियाम डॉसन प्रभावी ठरला. त्याने 20 धावांत 4 तर पॉट्सने 48 धावांत 2, बेथेलने 27 धावांत 2 आणि आदिल रशीदने 22 धावांत 1 गडी बाद केला. विंडीजने पॉवरप्ले दरम्यान 6 षटकात 44 धावांत 2 गडी गमविले. विंडीजच्या डावामध्ये 5 षटकार आणि 13 चौकार नोंदविले गेले.
संक्षिप्त धावफलक: इंग्लंड 20 षटकात 6 बाद 188 (स्मिथ 38, बटलर 96, बेथेल नाबाद 23, जॅक्स 9, अवांतर 12, शेफर्ड 2-33, जोसेफ, रसेल, चेस प्रत्येकी 1 बळी), विंडीज 20 षटकात 9 बाद 167 (लेवीस 39, चाल्स 18, चेस 24, पॉवेल 13, रसेल 15, शेफर्ड 16, होल्डर नाबाद 16, अवांतर 18, डॉसन 4-20, पॉट्स 2-48, बेथेल 2-27, रशीद 1-22)