ब्रूक, जॅक्समुळे इंग्लंडचा श्रीलंकेवर 89 धावांनी विजय
वृत्तसंस्था, चेस्टर-ले-स्ट्रीट :
कर्णधार हॅरी ब्रूकच्या 67 धावा आणि कमचलावू फिरकीपटू विल जॅक्सने घेतलेल्या पाच बळींच्या जोरावर इंग्लंडने श्रीलंकेविऊद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 89 धावांनी विजय मिळवून मर्यादित षटकांच्या क्रिकेट क्रिकेटमधील आपले वर्चस्व कायम राखले.
गेल्या आठवड्यात दोन्ही देशांमधील टी-20 मालिका इंग्लंडने 3-0 अशी जिंकल्यानंतर हा विजय मिळाला आहे. यजमान इंग्लंडचा डाव 265 धावांवर संपण्यापूर्वी विल जॅक्सने (5-22) गोलंदाजीसोबतच फलंदाजीतही मोलाचे योगदान दिले आणि नाबाद 46 धावा करत डावाच्या अखेरीस संघासाठी महत्त्वाच्या धावा जोडल्या. संथ आणि चेंडू कमी उसळी घेणाऱ्या खेळपट्टीवर श्रीलंकेचा संघ कधीच विजयाच्या स्थितीत दिसला नाही आणि त्यांचा संपूर्ण संघ 176 धावांत बाद झाला. ब्रूकने इंग्लंडतर्फे एकमेव अर्धशतक झळकावले, मात्र सलामीवीर बेन डकेट (32), ज्यो रूट (44) आणि जोस बटलर (31) यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले.
पाहुण्या संघासाठी पदार्पण करणारा लेगस्पिनर सचिंदू कोलंबगेने (3-44) आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात प्रभावी कामगिरी करत रूट आणि बटलर यांचे बळी टिपले. 28 वर्षीय कोलंबगेची गोलंदाजीची शैली वेगळी असून त्याचे चेंडू हवेत भरपूर वळताना पाहायला मिळतात. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 23,000 धावांचा टप्पा ओलांडणारा आठवा फलंदाज ठरलेल्या रूटला त्रिफळाचीत करून आपला पहिला आंतरराष्ट्रीय बळी मिळविला आणि नंतर बटलरला पायचित करून आणखी एका धोकादायक फलंदाजाला बाद केले. जॅक्सच्या एकूण धावसंख्येत सलग चार चौकारांचा समावेश होता.
मात्र यजमान संघाला पूर्ण षटके फलंदाजी करता आली नाही आणि 11 चेंडू शिल्लक असतानाच त्यांचा डाव संपला. गोलंदाजी करताना हाताला दुखापत झाल्यामुळे इंग्लंडचा फिरकीपटू आदिल रशीद या सामन्याला मुकला आणि तो संपूर्ण मालिकेतूनही बाहेर पडला आहे. जेकब बेथेलच्या अनुपस्थितीत टॉम बँटनने सलामीला फलंदाजी केली. सहा वर्षांतील त्याचा हा केवळ दुसराच एकदिवसीय सामना होता आणि त्याने 10 धावा केल्या.