For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

इंग्लंडचा लंकेवर 55 धावांनी विजय

06:26 AM Oct 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
इंग्लंडचा लंकेवर 55 धावांनी विजय
Advertisement

शतकवीर डकेट ‘सामनावीर’: डॉसनचे 4 बळी, पवन रत्नायकेचे शतक, कुसल मेंडिसचे अर्धशतक वाया

Advertisement

वृत्तसंस्था, लाहोर

तिरंगी वनडे मालिकेतील येथे खेळविण्यात आलेल्या दिवस-रात्रीच्या सहाव्या सामन्यात ‘सामनावीर’ बेन डकेटच्या दमदार शतकाच्या जोरावर इंग्लंडने लंकेचा 55 धावांनी पराभव केला. या सामन्यात लंकन संघाकडून रत्ननायकेने झळकवलेले शतक वाया गेले.

Advertisement

या सामन्यात लंकेने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी दिली. इंग्लंडने 50 षटकात 5 बाद 386 धावा जमविल्या. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल खेळताना लंकेचा डाव 45.1 षटकात 331 धावांवर आटोपला.

इंग्लंडच्या डावात डकेट आणि बँटन यांनी दमदार सुरुवात करुन दिली. या जोडीने 25 षटकात 163 धावांची दीडशतकी भागिदारी केली. बँटनने 75 चेंडूत 2 षटकार आणि 8 चौकारांसह 74 धावा झळकविल्या. कर्णधार ब्रुकने 34 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 44, जॅक्सने 21 चेंडूत 4 चौकारांसह 30, कॉक्सने 27 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 43 धावा झळकविल्या. डकेटने 132 चेंडूत 24 चौकारांसह 167 धावा झोडपल्या. तो तिसऱ्या गड्याच्या रुपात बाद झाला. सॅम करणने 12 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 21 धावा जमविल्या. लंकन गोलंदाजी पूर्णपणे निष्प्रभ ठरली. इंग्लंडच्या डावात 6 षटकार आणि 43 चौकार नोंदविले गेले. इंग्लंडने पहिल्या पॉवरप्ले दरम्यानच्या 10 षटकात 62 धावा जमविल्या. त्यानंतर दुसऱ्या पॉवरप्ले दरम्यानच्या 30 षटकात त्यांनी 232 धावा जमविताना 2 गडी गमविले. इंग्लंडने शेवटच्या 10 षटकात 92 धावांची भर घालताना 3 गडी गमविले. डकेटने 89 चेंडूत 14 चौकारांसह शतक पूर्ण केले. लंकेतर्फे असिता फर्नांडोने 63 धावांत 2 तर मदूशंका, मलिंगा आणि शनाका यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना लंकेच्या डावात सलामीचा कमिंदू मेंडीस चौथ्या षटकात 4 धावांवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर अविष्का फर्नांडो आणि कर्णधार कुशल मेंडीस यांनी दुसऱ्या गड्यासाठी 84 धावांची भागिदारी केली. फर्नांडोने 50 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह 48 धावा जमविल्या. कुशल मेंडीस आणि रत्ननायके यांनी तिसऱ्या गड्यासाठी 80 धावांची भर घातली. कुशल मेंडीसने 71 चेंडूत 5 षटकार आणि 8 चौकारांसह 89 धावा झळकविल्या. तो बाद झाल्यानंतर रत्ननायकेला लंकेच्या इतर फलंदाजांकडून बऱ्यापैकी साथ मिळू शकली नाही. रत्ननायकेने 77 चेंडूत 1 षटकार आणि 15 चौकारांसह 118 धावा जमविल्या. तो आठव्या गड्याच्या रुपात 45 व्या षटकात बाद झाला. लियानगेने 3 षटकार आणि 1 चौकारासह 27, अराच्चिगेने 4 चौकारांसह 30 धावा जमविल्या. 45.1 षटकात लंकेचा डाव 331 धावांवर आटोपल्याने त्यांना हा सामना 55 धावांनी गमवावा लागला.

लंकेच्या डावात 10 षटकार आणि 37 चौकार नोंदविले गेले. लंकेने पहिल्या पॉवरप्ले दरम्यानच्या 10 षटकात 55 धावा जमविताना एक गडी गमविला. तर दुसऱ्या पॉवरप्लेमध्ये त्यांनी 30 षटकात 245 धावा जमविताना 4 गडी गमविले. शेवटच्या 10 षटकांमध्ये लंकेने 31 धावा जमविताना 5 गडी गमविले. इंग्लंडतर्फे डॉसनने 49 धावांत 4 तर बेकरने 75 धावांत 2 तसेच सॅम करण, क्रोकोंब आणि रुट यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक - इंग्लंड 50 षटकात 5 बाद 386 (डकेट 167, बँटन 74, ब्रुक 44, जॅक्स 30, कॉक्स 43, सॅम करण नाबाद 21, असिता फर्नांडो 2-63, मदुशनका, मलिंगा आणि शनाका प्रत्येकी 1 बळी), लंका 45.1 षटकात सर्वबाद 331 (रत्नायके 118, कुशल मेंडीस 89, अविष्का फर्नांडो 48, लियानगे 27, अराछिगे 30, डॉसन 4-49, बेकर 2-75, क्रोकोंब, रुट, सॅम करण प्रत्येकी 1 बळी).

Advertisement
Tags :

.