पाकला नमवत इंग्लंड सेमीफायनलमध्ये
वृत्तसंस्था/ कँडी
कर्णधार हॅरी ब्रूक (51 चेंडूत 100) शानदार खेळीच्या जोरावर इंग्लंडने पाकिस्तानला नमवत आयसीसी टी 20 वर्ल्डकप स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना साहिबजादा फरहानच्या 63 धावांच्या खेळीच्या बळावर 164 धावा केल्या. तर प्रत्युत्तरात इंग्लंडने 19.1 षटकांत 8 विकेट्स गमावत 166 धावा करत 2 विकेट्सने विजय मिळवला. विशेष म्हणजे, सुपर 8 मध्ये हा त्यांचा सलग दुसरा विजय ठरला, ज्यामुळे इंग्लंड टॉप फोरमध्ये स्थान मिळवणारा पहिला संघ ठरला.
ब्रूकने 51 चेंडूंत शतक पूर्ण करताना 10 चौकार व 4 षटकार खेचला. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत शतक झळकावणारा तो पहिला कर्णधार ठरला. इंग्लंड सलग दोन विजयांसह उपांत्य फेरीत पोहोचला आहे आणि पाकिस्तानचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.
प्रारंभी, पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सैम आयुब (7), सलमान आघा (5) हे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर साहिबजादा फरहानने पाकिस्तानच्या डावाला आकार दिला. बाबर आझम (25) पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यापासून वंचित राहिला आणि त्याच्या संथ स्ट्राईक रेट पुन्हा चर्चेत आला. फखर झमान (25) व शादाब खान (23) यांनी शेवटच्या षटकांत केलेल्या फटकेबाजीमुळे पाकला 9 बाद 164 धावापर्यंत मजल मारता आली. साहिबजादाने 45 चेंडूंत 7 चौकार व 2 षटकारांसह 63 धावांची खेळी केली.
ब्रूकचे संयमी आणि धडाकेबाज शतक
इंग्लंडसाठी हा विजय बिलकुल सोपा नव्हता. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना फिल सॉल्टला भोपळाही फोडता आला नाही तर बटलर 2 धावा करुन बाद झाला. इंग्लंडने 17 धावांत दोन्ही सलामीवीर गमावले. शाहीनने त्याच्या तिसऱ्या षटकात जेकब बेथल (8) याला बाद करून इंग्लंडला मोठा धक्का दिला. यानंतर उस्मान तारिकने त्याच्या पहिल्या षटकात टॉम बँटनला (2) झेलबाद केले. त्यानंतर आलेला सॅम कुरनही 16 धावा करून माघारी परतला. एकीकडे विकेट जाण्याचे सत्र सुरु असताना कर्णधार ब्रूक दुसऱ्या बाजूने वादळी फटकेबाजी करत होता. त्याने 51 चेंडूंत 10 चौकार व 4 षटकारासह 100 धावांचे महत्वपूर्ण आणि विजयी खेळी साकारली. शतकानंतर तो लगेचच बाद झाला. यावेळी त्याने सामना 18 चेंडूंत 10 धावा एवढा जवळ आणला होता. विजयासाठी 5 धावा हव्या असताना विल जॅक्स (28) त्रिफळाचीत झाला. जॅक्सने ब्रूकसह 31 चेंडूंत 52 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. मोहम्मद नवाजने 19व्या षटकात दोन विकेट्स घेऊन सामन्यात रंगत आणली. जोफ्रा आर्चरने चौकार खेचून इंग्लंडचा 2 विकेट्स राखून विजय पक्का केला.
संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान 20 षटकांत 9 बाद 164 (साहिबजादा फरहान 63, बाबर आझम 25, फखर झमान 25, डॉसन 3 बळी, आर्चर आणि ओव्हर्टन प्रत्येकी 2 बळी)
इंग्लंड 19.1 षटकांत 8 बाद 166 (हॅरी ब्रूक 100, विल जॅक्स 28, सॅम करन 16, शाहिन आफ्रिदी 4 बळी, नवाज आणि उस्मान तारीक प्रत्येकी 2 बळी).
हॅरी ब्रूकचे विक्रमी शतक
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरलेल्या ब्रूकने पाकविरुद्ध 51 चेंडूत 100 धावांची विजयी खेळी साकारली. या खेळीसह त्याने महत्वपूर्ण विक्रमाला गवसणी घातली. पुरुषांच्या टी-20 वर्ल्डकपमध्ये शतक साजरे करणारा तो जगातील पहिला कर्णधार ठरला आहे. टी-20 वर्ल्डकपच्या आतापर्यंतच्या 9 हंगामात एकाही कर्णधाराला या स्पर्धेत शतकी खेळी करता आलेली नाही. ब्रूकच्या आधी विंडीजचा ख्रिस गेल 98 धावांवर बाद झाला होता.