For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इंग्लंड 384, कांगारुंचेही प्रत्युत्तर

06:58 AM Jan 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
इंग्लंड 384  कांगारुंचेही प्रत्युत्तर
Advertisement

जो रुटचे 41 वे शतक : ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या दिवशी 2 बाद 166 धावा :  हेड शतकाच्या उंबरठ्यावर

Advertisement

वृत्तसंस्था/ सिडनी

येथील सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर अनुभवी जो रुटच्या शानदार शतकी खेळीनंतर इंग्लंडचा पहिला डाव 384 धावांत आटोपला. यजमान ऑस्ट्रेलियन संघानेही जोरदार प्रत्त्युतर देताना दुसऱ्या दिवसअखेरीस 34.1 षटकांत 2 बाद 166 धावा केल्या आहेत. ट्रॅव्हिस हेड 91 तर मायकेल नेसर 1 धावांवर नाबाद राहिले. ऑसी संघ अद्याप 218 धावांनी पिछाडीवर असून आज तिसऱ्या दिवशी त्यांचा आघाडी घेण्याचा प्रयत्न असेल.

Advertisement

प्रारंभी, इंग्लिश संघाने 3 बाद 211 धावसंख्येवरुन दुसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात केली. स्टार फलंदाज हॅरी ब्रूकला शतकाच्या उंबरठ्यावर असताना बोलँडने बाद करत ऑस्ट्रेलियाला दिवसभरातील पहिले यश मिळवून दिले. ब्रूकने 97 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकारासह 84 धावांचे योगदान दिले. यानंतर फलंदाजीला आलेल्या कर्णधार बेन स्टोक्सला भोपळाही फोडता आला नाही. स्टोक्स बाद झाल्यानंतर जो रुटला जेमी स्मिथने चांगली साथ दिली. या दोघांनी 94 धावांची भागीदारी करत संघाला त्रिशतकी मजल मारुन दिली. ही जोडी जमलेली असतानाच स्मिथला 46 धावांवर लाबुशेनने तंबूचा रस्ता दाखवला.  यानंतर विल जॅक्सने 27 धावा केल्या. एकीकडे इंग्लिश फलंदाज झटपट बाद होत असताना यादरम्यान, रुटने कसोटीतील आपले 41 वे शतक पूर्ण केले. त्याने 242 चेंडूचा सामना करताना 15 चौकारासह 160 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. तो बाद झाल्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव 97.3 षटकांत 384 धावांत संपला. ऑस्ट्रेलियाकडून मायकेल नेसरने सर्वाधिक 4 गडी बाद केले. मिचेल स्टार्क आणि स्कॉट बोलँडने प्रत्येकी 2 गडी बाद केले.

हेडची आक्रमक खेळी, कांगारुंचेही प्रत्युत्तर

सलामीवीर टॅव्हिस हेड आणि वेदराल्ड यांनी अर्धशतकी भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करुन दिली. पण, या जमलेल्या जोडीला बेन स्टोक्सने धक्का दिला. वेदराल्ड 21 धावा करुन बाद झाला. यानंतर हेड आणि लाबुशेनने शतकी भागीदारी साकारली. या जोडीने इंग्लिश गोलंदाजांचा सामना करताना एकेरी-दुहेरी धावांवर भर देत संघाचा धावफलक हलता ठेवला. यादरम्यान, लाबुशेनला 48 धावांवर स्टोक्सनेच तंबूचा रस्ता दाखवला. हेडने नेहमीच्या शैलीत शानदार खेळी साकारताना 87 चेंडूत 15 चौकारासह 91 धावा फटकावल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 34.1 षटकांत 2 बाद 166 धावा केल्या होत्या. हेड 91 तर नेसर 1 धावांवर खेळत होता.

संक्षिप्त धावफलक

इंग्लंड पहिला डाव 384

ऑस्ट्रेलिया पहिला डाव 34.1 षटकांत 2 बाद 166 (टॅव्हिस हेड खेळत आहे 91, वेदराल्ड 21, लाबुशेन 48, नेसर खेळत आहे 1, बेन स्टोक्स 2 बळी).

जो रुटचा आणखी एक कारनामा, रिकी पाँटिगच्या विक्रमाशी बरोबरी

इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुटने अॅशेस मालिकेतील दुसरे शतक झळकावताना 160 धावांची खेळी साकारली. या शतकासह रुट कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगच्या बरोबरीने पोहोचला. दोघांच्या नावावर आता 41 कसोटी शतके आहेत. रुटने ही कामगिरी आपल्या 163 व्या कसोटीत केली, तर पॉन्टिंगने 168 कसोटी सामने खेळले होते. या यादीत आता रुटच्या पुढे फक्त दोन फलंदाज सचिन तेंडुलकर (51 शतके) आणि जॅक कॅलिस (45 शतके) आहेत.

स्टोक्स-लाबुशेन यांच्यात बाचाबाची

अॅशेस मालिकेत पाचव्या कसोटीत दोन दिवसांचा खेळ संपला असून सामना ऑस्ट्रेलियाकडे झुकलेला आहे. असे असताना दुसऱ्या दिवशी मैदानात एक वाद पाहायला मिळाला. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाबुशेन आमनेसामने आले. तिसऱ्या सेशनमध्ये या दोघांमध्ये वाद झाल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे मैदानात काही काळ वातावरण तापलेलं होतं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कर्णधार बेन स्टोक्स षटक टाकत होता आणि षटक संपल्यावर स्टोक्स लाबुशेनच्या बाजूने गेला. तेव्हा स्टोक्सने त्याला डिवचले. त्यानंतर स्टोक्स त्याच्या खांद्यावर हात ठेवून काही तरी बोलला. त्यानंतर लाबुशेनच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याचं दिसले. यावेळी दोघेही आक्रमक असल्याचे दिसून आले.

Advertisement
Tags :

.