विमानतळ टर्मिनल बांधकामाला चेन्नईतील अभियंत्यांची भेट
कामाचा दर्जा तपासून केल्या विविध सूचना
बेळगाव : सांबरा येथील बेळगाव विमानतळ परिसरात नवीन टर्मिनल बिल्डींग उभारली जात आहे. या भव्य टर्मिनल बिल्डींगच्या कामाचा आढावा नुकताच चेन्नई येथील इंजिनिअरिंग विभागाच्या सरव्यवस्थापकांनी घेतला. टर्मिनल बिल्डींग उच्च दर्जाची व्हावी यासाठी त्यांनी अनेक सूचना केल्या आहेत. एकूण 322 कोटी रुपये खर्च करून 19 हजार 600 चौरस मीटर क्षेत्रफळाची टर्मिनल बिल्डींग उभारली जात आहे. प्रवाशांची संख्या वाढत असल्याने मोठे टर्मिनल बांधले जात आहे. यामध्ये एकाचवेळी 2400 प्रवासी हाताळण्याची क्षमता असणार आहे. अनेक अत्याधुनिक सुविधा टर्मिनल बिल्डींगमध्ये दिल्या जाणार असल्याने अशा पद्धतीने काम सुरू आहे. चेन्नई येथील विमानतळ प्राधिकरणाच्या इंजिनिअरिंग विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच बेळगाव विमानतळाला भेट दिली. यावेळी त्यांनी कामाचा दर्जा तपासण्यासोबतच इतर अडचणींबाबत अहवाल घेतला. विमानतळाच्या संरक्षक भिंतीच्या बाजूला पाणी साचत असून याबाबतची माहिती त्यांनी जाणून घेतली. यावेळी विमानतळाचे संचालक त्यागराजन यांच्यासमवेत इतर अधिकारी उपस्थित होते.