Solapur News : सिद्धेश्वर तलावात अभियांत्रिकी विद्यार्थी बुडून मृत्युमुखी ; १८ तासांनी सापडला मृतदेह
फलटण तालुक्यातील तरुणाचा तलावात बुडून मृत्यू
सोलापूर : सिद्धेश्वर तलावात पोहण्यासाठी गेलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील तरुणाचा रविवार १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी चारच्या सुमारास बुडून मृत्यू झाला. तब्बल १८ तासांनंतर सोमवारी सकाळी दहा वाजता सुरंजन शेंडगे याचा मृतदेह पाण्यात मिळून आला. सुरंजनच्या मित्राने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. तथापि त्याला यश आले नाही.
दरम्यान, यावेळी त्याच ठिकाणाहून जाणाऱ्या बोटीतील गाईला सुरंजनचा मित्र आयुष माळवदकर याने माझा मित्र पाण्यात बुडत आहे, त्याला वाचवा अशी विनवणी केली. परंतु गार्डने मला पोहता येत नाही, असेउत्तर दिले. गार्डने मदत केली असती तर आज त्याचा जीव वाचला असता, अशी भावना त्याचे काका चंद्रकांत निकम यांनी 'तरुण भारत संवाद शी बोलताना व्यक्त केली.
फलटण तालुक्यातील राजाळे या गावचा सुरंजन सोलापुरातील शेंडगे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात मेकॅनिकल डिप्लोमाच्या पहिल्या वर्षात शिकत होता. रविवारी तो सुट्टी असल्याने दोघा मित्रांसोबत सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेला. त्या ठिकाणी त्यांना पोहण्याचा मोह झाल्याने गणपती घाट या परिसरातून तलावात उड्या घेतल्या. अंतर पार करता न आल्याने दम छाटल्याने तो पाण्यात बुडू लागला. ही घटना लक्षातआल्यानंतर माळवदकर यानेही त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले.
याच दरम्यान त्याच परिसरातून एक बोट जात होती. त्यावर असलेल्या गाईला आयुषने सुरंजनला वाचवण्याची विनवणी करत होता. मात्र, गार्डने मला पोहता येत नाही असे उत्तर दिल्याचे सांगितले जाते. जर करता गार्डलाच पोहता येत नसेल तर असे कर्मचारी बोटिंगवर कशासाठी ठेवलेले आहेत, असा प्रश्न निर्माण होत आहे. शेवटी सुरंजन हा सायंकाळी चार वाजता पाण्यात बुडाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक तसेच आयुष माळवदकर याच्या सांगण्यानुसार तलावातील पाण्यात त्याचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह आढळून आला. तब्बल १८ तासानंतर मृतदेह सापडला.
त्यानंतर सुरंजनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. सुरंजन हा गरीब कुटुंबातील होता. त्याचे
आई-वडील शेती करतात. राजाळे या गावी त्यांची स्वतःची चार एकर शेत जमीन आहे. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. सुरंजन याला मोठी बहीण आहे. ती सुद्धा पुणे येथे भारती विद्यापीठात शिक्षण घेत आहे. आपल्या पदरी आलेले दारिद्र्य आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये.
तसेच त्यांच्या रूपाने आपली गरिबी नष्ट होईल ही आशा उराशी बाळगून त्यांनी मुलांसाठी सोलापुरातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घेतला. येथेच त्याला खासगी रूम करून राहण्यासाठी ठेवले. त्याला वेळोवेळी लागणारा खर्च ते पाठवत असत. सुरंजन हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. मात्र तोही काळाने हिरावून घेतला.