अभियांत्रिकी वस्तूंच्या निर्यातीत जानेवारीत 10 टक्के वाढ
10 अब्ज डॉलर्सची केली निर्यात : एप्रिल-जानेवारीत चांगली कामगिरी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताने जानेवारी 2026 मध्ये आपल्या अभियांत्रिकी वस्तूंच्या निर्यातीमध्ये 10 टक्के इतकी वाढ नोंदविली आहे. एकंदरीत पाहता 10.40 अब्ज डॉलर्सच्या अभियांत्रिकी वस्तूंची निर्यात विदेशात करण्यात आली आहे. यामध्ये तांबे, लोह खनिज, पोलाद व वाहन यांचा समावेश आहे.
अमेरिकेची निर्यात
अमेरिकेला भारत मोठ्या प्रमाणामध्ये अभियांत्रिकी वस्तूंची निर्यात करतो. मात्र ही निर्यात अमेरिकेला जानेवारी 2026 मध्ये 6 टक्के इतकी घसरलेली दिसते. अमेरिकेला भारताने 1.51 अब्ज डॉलर्सच्या अभियांत्रिकी वस्तूची निर्यात केली होती. 2025 जानेवारीमध्ये हीच निर्यात 1.62 अब्ज डॉलर्सची होती. वर्षाच्या आधारावर पाहता एप्रिल ते जानेवारी 2025-26 या कालावधीत भारताने 4 टक्के वाढीसह 101.13 अब्ज डॉलर्सच्या अभियांत्रिकी वस्तूंची निर्यात केलेली आहे. चालू आर्थिक वर्षामधील ही इतक्या मूल्याची विक्रमी निर्यात मानली जात आहे.
सध्याला जागतिक स्तरावरील भूराजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने केलेली निर्यात ही स्पृहणीय राहिली आहे. येणाऱ्या काळातही अभियांत्रिकी वस्तूंची निर्यात वाढणार असून आर्थिक वर्ष 2026 मध्ये अमेरिकेला 120 अब्ज डॉलर्सच्या वस्तूंची निर्यात केली जाऊ शकते. मार्केट अॅक्सेस स्किम (बाजार उपलब्धता योजना) ही योजना जागतिक बाजारात भारताला निर्यातीसाठी महत्त्वाची ठरत आहे.
किती देशांना होते निर्यात
भारत आघाडीवरच्या 25 देशांना एकंदर अभियांत्रिकी वस्तू निर्यात करीत असून 19 देशांमध्ये निर्यातीत प्रगती दिसून आली आहे. वस्तूंच्या निर्यातीसाठी आजही अमेरिका हा सर्वात मोठा देश राहिला आहे. संयुक्त अरब अमिरात, सौदी अरेबीया, जर्मनी, युके व चीन येथेही निर्यात चांगली झाली आहे.