इंजिनियर रशिद यांचे ‘तिहार’मध्ये आत्मसमर्पण
नियमित जामिनावर 19 नोव्हेंबरला सुनावणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अंतरिम जामिनाची मुदत संपल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथील खासदार आणि टेरर फंडिंग प्रकरणातील आरोपी इंजिनियर रशिद यांनी सोमवारी दुपारी दिल्लीतील तिहार कारागृहात आत्मसमर्पण केले. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या काळात त्यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. आता त्यांच्या नियमित जामीन याचिकेवर पटियाला हाऊस कोर्ट 19 नोव्हेंबर रोजी निकाल देणार आहे. तसेच पटियाला हाऊस कोर्ट 13 नोव्हेंबरला इंजिनियर रशीदच्या आणखी एका याचिकेवर निकाल देणार आहे. या याचिकेत रशीद यांनी आपल्याविऊद्ध दाखल केलेल्या खटल्याची विशेष खासदार/आमदार न्यायालयात सुनावणी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
इंजिनियर रशीद यांना जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अंतरिम जामीन मिळाल्याने त्यांची तुरुंगातून सुटका झाली होती. मुदत संपत आली असतानाच 2 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर वडिलांच्या प्रकृतीच्या आधारावर त्यांचा अंतरिम जामीन 28 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आला. आता 19 नोव्हेंबरला न्यायालय जामिनावर काय निर्णय देते हे पाहायचे आहे. इंजिनियर रशीद यांच्या याचिकेवर पटियाला हाऊस न्यायालय 13 नोव्हेंबर रोजी या खटल्याची सुनावणी सध्याच्या न्यायालयात करायची की विशेष खासदार आमदार न्यायालयात याबाबत निर्णय देणार आहे.