प्रचारासाठी इंजिनियर राशिदला अंतरिम जामीन
बारामुल्लाच्या खासदाराला मिळाला दिलासा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जम्मू-काश्मीरमधील टेरर फंडिंग प्रकरणाचा आरोपी आणि बारामुल्लाचा खासदार इंजिनियर राशिदला जामीन मिळाला आहे. दिल्लीच्या पतियाळा हाउस न्यायालयाने मंगळवारी राशिदला अंतरिम जामीन मंजूर केला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी त्याला हा दिलासा मिळाला आहे. तर त्याच्या नियमित जामीन याचिकेवर न्यायालय आज निर्णय देणार आहे.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश चंदर जीत सिंह यांनी याप्रकरणी 28 ऑगस्ट रोजी जामीन याचिकेवर इन कॅमेरा युक्तिवाद ऐकल्यावर निर्णय राखून ठेवला होता. न्यायालयाने यापुर्वी राशिदला बारामुल्ला मतदारसंघात लोकसभा निवडणूक जिंकल्यावर शपथ घेण्यासाठी पॅरोल दिला होता. इंजिनियर राशिद या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शेख अब्दुल राशिदने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बारामुल्ला येथे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना पराभूत केले होते.