For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अभियंत्याचे अपहरण करून लुबाडणूक

12:03 PM May 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
अभियंत्याचे अपहरण करून लुबाडणूक
Advertisement

थिवी येथील राजस्थानींचा पराक्रम : सावंतवाडीत लपलेल्या तिघांना अटक,कोलवाळ पोलिसांची यशस्वी कारवाई

Advertisement

म्हापसा/थिवी : देय रक्कमेसाठी एका बांधकाम अभियंत्याचे अपहरण करून त्याची लुबाडणूक करण्याचा प्रकार थिवी येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी तिन्ही संशयितांना सावंतवाडी (महाराष्ट्र) येथून अटक केली असून अपहरणासाठी वापरलेली कार जप्त केली आहे, अशी माहिती कोलवाळ पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विजय राणे यांनी दिली. बलवीर सिंग शिशपाल गुर्जर (33, सध्या राहणारा थिवी, मूळचा राजस्थान), राजकुमार गिरीधरलाल चौधरी (33, सध्या राहणारा थिवी, मूळचा राजस्थान) आणि विरेंदर सुरजीतलाल कुमार (59, रा. थिवी व मूळचा दिल्ली) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

अपहरणाचा हा प्रकार रविवार दि. 28 रोजी सायंकाळी 4.30 ते रात्री 9.30 वाजण्याच्या दरम्यान घडला आहे. याप्रकरणी फिर्यादी हितेश बाबूलालजी जंगीड (सध्या राहणारा माडेल थिवी व मूळचे राजस्थान) यांनी सोमवार दि. 29 रोजी सकाळी कोलवाळ पोलिसात तक्रार दिली. संशयित आरोपी बलवीर सिंग व राजकुमार यांचा टाईल्स फिटिंगचा व्यवसाय असून सुरजीतकुमार हा त्यांच्याकडे कामाला होता. फिर्यादी हितेश जंगीड हे बांधकाम अभियंते असून ते राजस्थानमधीलच असल्याने त्यांची व्यवसायादरम्यान ओळख झाली. फिर्यादी व्यावसायातील काही रक्कम संशयितांना द्यायचे होते. यातूनच हा अपहरण करण्याचा प्रयत्न घडला.

Advertisement

ही रक्कम वसूल करण्याच्या हेतूने संशयितांनी हितेश यांना आपल्या ब्रेझा कारमध्ये बसवले आणि त्यांना मारहाण करीत त्यांच्याकडे पैसे मागितले. नंतर एका निर्जनस्थळी असलेल्या खोलीमध्ये नेऊन तिथेही मारहाण केली. हितेश याच्याकडे पैसे नसल्याचे पाहून त्यांच्या हातातील अंगठी, खिशातील 5 हजार ऊपये, मोबाईल फोन घेऊन रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास हितेशच्या दुचाकीकडे त्यांना सोडले. तक्रार दाखल होताच कोलवाळ पोलिसांनी संशयितांची शोधाशोध केली. संशयित सावंतवाडी येथे असल्याची माहिती निरीक्षक विजय राणे यांना मिळाल्यावर पोलिसांनी तिथे जाऊन तिन्ही संशयितांना कारसमवेत ताब्यात घेतले व पोलीस स्थानकात आणून रितसर अटक केली. संशयितांविऊद्ध भा.दं.सं.च्या 392, 365, 506 (2) व 120 ब कलमांतर्गत अपहरण व लुबाडणुकीचा गुन्हा नोंद केला आहे. पोलीस अधीक्षक अक्षत कौशल, उपअधीक्षक संदेश चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विजय राणे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक सुभाष गावकर, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील व निखिल नाईक या पथकाने ही कामगिरी केली. पुढील तपास कोलवाळ पोलीस करीत आहेत.

Advertisement
Tags :

.