पंधरा हजाराची लाच स्वीकारताना अभियंता जाळ्यात
सातारा :
उर्किडे(ता. माण) गावातील जिल्हा परिषद शाळेच्या खोलीचे बांधकाम तकारदार यांनी केले. या कामाच्या बिलाची मंजुरी पाठवण्यासाठी शाखा अभियंता याने खाजगी इसमामार्फत पाच हजाराची लाच स्विकारताना लाच लुचपत विभागाने रंगेहात पकडले.
भरत संभाजी जाधव (वय-54 वर्ष, नोकरी, रा. डवरमळा, दहिवडी. ता. माण जि.सातारा), बुवासाहेब जयराम जगदाळे (वय 61 वर्ष, रा. बिदाल ता. माण) अशी त्यांची नावे आहेत.
या बाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार हे बांधकाम ठेकेदार असून त्यांनी उर्किडे (ता. माण) जिल्हा परिषद शाळा खोलीचे बांधकाम केले. त्यांचे बिल मंजुरीसाठी पाठवण्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभाग, उपविभाग दहिवडी (वर्ग-2 अराजपत्रित)शाखा अभियंता भरत जाधव यांनी तक्रारदार यांचेकडे 20 हजाराच्या लाचेची मागणी करून 15 हजाराची लाच रक्कम स्विकारण्यास तयार झाले. यातील पाच हजार रुपये खाजगी इसम बुवासाहेब जगदाळे यांच्या मार्फत पंचायत समिती बांधकाम विभाग कार्यालय दहिवडी येथे स्विकारताना लाच लुचपत प्रतिबंध विभाने रंगेहात पकडले असून त्यांचे विरोधात दहिवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक राजेश वाघमारे, पोलीस हवालदार नितीन गोगावले,निलेश राजपूरे, गणेश ताटे यांनी केली.