एन्गिडीला हॉस्पिटलमधून ‘डिस्चार्ज’
तुमच्या संदेशांबद्दल धन्यवाद, सर्व काही ठीक आहे : एन्गिडी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामन्यादरम्यान डोक्याला दुखापत झाल्यानंतर, दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडीने चाहत्यांना दिलासा देणारे एक निवेदन दिले आहे. या घटनेनंतर आपली प्रकृती पूर्णपणे ठीक असल्याचे त्याने चाहत्यांना त्यातून सांगितले आहे.
शनिवारी दुपारी दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामन्यादरम्यान मैदानावर एका चिंताजनक प्रसंगाचा भाग ठरलेल्या या दक्षिण आफ्रिकन वेगवान गोलंदाजाने, रविवारी आपल्या ‘इन्स्टाग्राम‘ या सोशल मीडिया हँडलद्वारे चाहत्यांनी व्यक्त केलेल्या काळजीबद्दल त्यांचे आभार मानले. दुखापतीच्या या घटनेनंतर दिलेल्या आपल्या पहिल्याच सार्वजनिक प्रतिक्रियेत, इन्स्टाग्रामवर एक ‘स्टोरी‘ शेअर करताना एन्गिडीने लिहिले, ‘तुमच्या संदेशांबद्दल धन्यवाद, सर्व काही ठीक आहे’. या संदेशाद्वारे त्याने आपल्या प्रकृतीबद्दलच्या भीतीचे निरसन केले.
अरुण जेटली स्टेडियमवर पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यादरम्यान दुखापत झाल्यानंतर एन्गिडीला दिल्लीतील एका रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. या वेगवान गोलंदाजाच्या डोक्याच्या मागील बाजूस आणि मानेवर अत्यंत जोरात (धोकादायक पद्धतीने) जमिनीवर आघात झाला होता. यातून बरा झाल्यानंतर त्याला सुपर स्पेशालिटी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सामन्यादरम्यान डोक्याला दुखापत झाल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दिल्ली कॅपिटल्सचे अध्यक्ष आणि सह-मालक किरण कुमार ग्रांधी यांनी रुग्णालयात जाऊन एन्गिडीची भेट घेतली.