For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दोघांनाही हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी लांबणीवर

02:46 PM Mar 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
दोघांनाही हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी लांबणीवर
Advertisement

वाहतूकमंत्री गुदिन्हो यांची माहिती : हेल्मेटसाठी जनजागृतीचे काम सुरूच

Advertisement

पणजी : येत्या एक एप्रिलपासून स्कूटरवर बसणाऱ्या दोन्ही व्यक्तींना हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय आता आणि तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे एक एप्रिलपासून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणार नाही. मात्र नंतर टप्प्याटप्प्याने कार्यवाही सुरू करण्यात येईल, अशी माहिती वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली. त्यांनी सांगितले की राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा बैठकीमध्ये बहुतेकजणांनी दुचाकी वाहनावर पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीला देखील शिरस्त्राण सक्तीचे करावे, अशी जोरदार मागणी केली होती. आपणही त्या मागणीचे समर्थन केले होते. काही महिन्यांपूर्वी झालेल्या या बैठकीनंतर गोव्यात लागलीच आम्ही जनजागृती सुरू केली. विविध शाळा, महाविद्यालये तसेच अन्य बऱ्याच ठिकाणी जनतेला हेल्मेटची गरज काय आहे, याविषयी माहिती दिली. तसेच त्यांच्यासाठी विशेष टेलिफिल्म देखील दाखवली.

कायद्यातही आहे तरतूद

Advertisement

वाहनावर पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीला देखील हेल्मेटची सक्ती केली आहे. कायद्यातही त्याची तरतूद आहे. अंमलबजावणी करण्यात जनतेचे सहकार्य आवश्यक आहे. या संदर्भात आम्ही गेले सहा महिने विविध ठिकाणी जनजागृतीचे काम करीत आहोत आणि त्याला उत्तम प्रतिसाद देखील मिळालेला आहे. काही माणसे दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करीत नाहीत, असे निदर्शनास आले आहे. सरकार आता अनेक गोष्टींचा अभ्यास करीत आहे. त्यामुळे आम्ही एक एप्रिलपासून त्याची कडकपणे अंमलबजावणी न करता टप्प्याटप्प्याने करणार आहोत. साधारणत: जुलैमध्ये प्रत्यक्षात संपूर्ण गोव्यात त्याची कार्यवाही केली जाईल असे वाहतूकमंत्र्यांनी सांगितले.

...तरीही प्रमाण कमी होत नाही

गुदिन्हो पुढे म्हणाले की, अपघातांचे देशभरात वाढते प्रमाण ही एक गंभीर बाब आहे. गोव्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात अपघात होतात आणि हे अपघात नियंत्रणात आणण्यासाठी दुचाकी वाहनावर बसणाऱ्या व्यक्तींना हेल्मेटची सक्ती आवश्यक आहे. जी मंडळी हेल्मेट घालत नाही, त्यांना दंड ठोठावण्याचे काम देखील सरकारने केलेले आहे. तरीही हेल्मेट न वापरण्याचे प्रमाण कमी होत नाही.

Advertisement
Tags :

.