योग्य नियोजनामुळेच विजेची बचत
व्यंकट विक्रम : फौंड्री क्लस्टरमध्ये उद्योजकांसाठी कार्यशाळा
बेळगाव : वीज वाचविण्याचे मोठे आव्हान औद्योगिक कारखान्यांसमोर आहे. विजेचे योग्य नियोजन केले तरच विजेचा परिपूर्ण वापर करून घेता येऊ शकतो. मशिनरीला लागणारा वीजपुरवठा व वेळेचे नियोजन केल्यास विजेची बचत होऊ शकते. यासाठी प्रत्येक उद्योगात विजेचे नियोजन महत्त्वाचे आहे, असे विचार दिल्ली येथील तज्ञ व्यंकट विक्रम यांनी व्यक्त केले. बेळगाव फौंड्री क्लस्टर, ब्युरो ऑफ एनर्जी एफिसिएन्सी व जर्मन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेचे उद्घाटन मंगळवारी जिल्हा उद्योग केंद्राचे सहसंचालक सत्यनारायण भट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दिल्ली येथील तज्ञ व्यंकट विक्रम यांनी उद्योजकांशी संवाद साधला. दोन दिवस या कार्यशाळेमध्ये विजेच्या वापरासंदर्भात जागृती करण्यात आली. कार्यक्रमाला बेळगाव फौंड्री क्लस्टरचे चेअरमन राम भंडारे, सेक्रेटरी सदानंद हुंबरवाडी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फौंड्रीमनचे सेक्रेटरी विक्रम सैनूचे, जीआयझेडचे पियुष शर्मा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यशाळेला 70 हून अधिक औद्योगिक कारखान्यांचे प्रतिनिधी व 30 इंंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते.