दुसऱ्या दिवशी कारवाईपूर्वीच अतिक्रमणे स्वतःहून हटवली
लांजा :
शहरात गुरुवारपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली. शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी प्रशासनाकडून कारवाई सुरू करण्याआधीच नागरिकांनी अनधिकृत अतिक्रमणे स्वतः काढण्यास सुरुवात केल्याने थांबवण्यात आली. त्याचप्रमाणे दुकानाला लागून वाढीव केलेल्या शेडही काढण्यात आल्या. यामुळे लांजा शहरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या सार्वजनिक जागा मोकळ्या होत आहेत.
नगर पंचायत कार्यक्षेत्रातील मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा शहरातील अतिक्रमणे ३ जुलैपर्यंत हटवावीत अन्यथा पोलीस बंदोबस्तात ती हटवण्यात येतील. तसेच संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असे आवाहन राष्ट्रीय महामार्ग विभागाच्यावतीने करण्यात आले होते. त्यानुसार गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग विभागाने नगर पंचायत कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणे काढण्यात आली. प्रशासनाने शहरातील तहसीलदार कार्यालय ते कोर्ले रोड फाटा यामधील अनधिकृत खोके, टपऱ्या व इतर अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली आहे. शहरातील सर्व्हिस रोडलगत असलेल्या गटारापासून ५ फूटपर्यंत अतिक्रमणे काढण्यात येत आहेत. तर उड्डाणपुलाखाली बसणारे फेरीवाल्यांना मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती, परंतु त्या बाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. तूर्तास फेरीवाल्यांचे पुलाखालील खोके सुरू आहेत.