Pachwad Village | निवडणूक तोंडावर असतानाही पाचवड ग्रामपंचायतीचा मोठा निर्णय; अतिक्रमणांवर फिरवला बुलडोझर
वडूज : खटाव तालुक्यातील पाचवडयेथील गायरानातील गट नंबर १७१९/५ व गट नंबर १७४२/१ या दोन ठिकाणी काही ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते. ग्रामपंचायत प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात एकाच दिवशी ही सर्व अतिक्रमणे हटवली.
वरील दोन्ही गटात गावातील काही लोकांनी दगड, माती, बांबूचा वापर करून कच्ची, पक्की शेड, जनावरांचे गोठे उभे केले होते. त्याचबरोबर काहींनी वैरणीच्या गंजी लावल्या होत्या. एका गटातील काही अतिक्रमणामुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे खेळाचे ग्राउंड बंद झाले होते. त्यामुळे अतिक्रमण धारकांच्या विरोधात विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. लोकभावना जाणून घेऊनग्रामपंचायतीने वरील सर्व अतिक्रमणे काढण्याचा धाडशी निर्णय घेतला.
वडूजचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्रांत पाटील, अमित शिंदे, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दिपक महागंडे, ग्रामविकास अधिकारी समीर गाडवे, श्री. खंदारे, श्री. कारंडे, गावकामगार तलाठी श्री. बीड, श्री. धूमगोंड यांच्यासह सरपंच शालन घाडगे, उपसरपंच वंदना कटरे, माजी सरपंच अनिल घाडगे, काकासाहेब घाडगे आदींनीया मोहिमेत सक्रीय सहभाग घेतला. ग्रामपंचायत निवडणूक तोंडावर असताना देखील पाचवड येथील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अतिक्रमण काढण्याचा धाडसी निर्णय घेतल्याबद्दल परिसरात पाचवड ग्रामपंचायतीचे कौतुक होत आहे.
अन्य ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे धाडस दाखवून अतिक्रमणाची कीड समूळ नष्ट करण्याची मागणी सजग नागरिकांतून होत आहे.