Satara : गेंडामाळ नाक्यावरील टपऱ्यांची अतिक्रमणे हटवली
सातारा शहरातील वाहतूक सुरक्षेसाठी महत्वाची कारवाई!
सातारा : सातारा शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत वर्दळीच्या असलेल्या सातारा शाहूपुरी या दोन भागांना जोडणाऱ्या गेंडामाळ नाका परिसरातील टपऱ्यांची अतिक्रमणे सातारा नगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने शनिवारी हटवली.
चौकात टपऱ्यांची वाढलेली गर्दी व त्यामुळे निर्माण झालेला अपघाताचा धोका लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रभारी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी दिली. शहरात टपऱ्यांच्या अतिक्रमणामुळे होणारी वाहतूक कोंडी हा सध्या संवेदनशील विषय ठरला असून, यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी वाहतूक आराखडा तयार केला जात आहे.
या आराखड्याची अंमलबजावणी सातारा पोलीस व पालिका यांच्या समन्वयातून करण्यात येणार असल्याचेही बापट यांनी सांगितले. गेंडामाळ नाका परिसरात शाहूपुरी तसेच अर्कशाळा नगरकडून फाशीच्या वडाकडे येणाऱ्या रस्त्यावर तीव्र उतार असल्याने समोरून येणारी वाहने दिसत नाहीत. त्यातच टपऱ्यांमुळे चौकात गर्दी होत असल्याने अपघाताचा धोका वाढला होता. या संदर्भात नगरसेवक विश्वतेज बालगुडे यांनी तक्रार केल्यानंतर प्रभारी मुख्याधिकारी बापट यांच्या निर्देशानुसार तातडीने कारवाई केली.
शहर विकास विभागांतर्गत कार्यरत अतिक्रमण हटाव निरीक्षक प्रशांत निकम यांच्या नेतृत्वाखाली दहा कर्मचायांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. शनिवारी सुट्टीचा दिवस असतानाही पाणीपुरवठा विभाग व शहर विकास विभागाचे कर्मचारी कामकाजासाठी सक्रिय होते. कारवाईदरम्यान गेंडामाळ नाक्यावरील दोन टपऱ्या तात्काळ हटवण्यात आल्या. यावेळी कर्मचारी व टपरीचालकांमध्ये काही काळ वादावादी झाल्याचेही पाहायला मिळाले.