अधिवेशनच्या पार्श्वभूमीवर अतिक्रमण हटाव मोहीम
पदपथावर थाटलेले स्टॉल, दुकाने हटविली : रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास
बेळगाव : कर्नाटक विधिमंडळाचे अधिवेशन बेळगावमध्ये होणार असल्याने या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. सोमवारपासून या मोहिमेला प्रारंभ झाला असून पदपथावर मांडण्यात आलेले स्टॉल, दुकाने हटविण्यात आली आहेत. मंगळवारीही मोहीम सुरू ठेवल्याने रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. 9 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. याकाळात मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्रिमंडळ व आमदार बेळगावमध्ये येणार असल्याने रस्त्यावर असलेले अतिक्रमण हटविण्यात येत आहे. सिव्हिल हॉस्पिटल रोड, अयोध्यानगर, सदाशिवनगर, पोलीस क्वॉर्टर्स रोड या परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आले. रस्त्याशेजारी व पदपथावर खाद्यपदार्थ विक्री, साहित्य विक्रीचे स्टॉल उभारण्यात आले होते. हे स्टॉल महापालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेतील कर्मचाऱ्यांनी हटविले. यामुळे रस्त्यांनी बऱ्याच दिवसांनंतर मोकळा श्वास घेतला.