शहरातील अतिक्रमण हटता हटेना
विक्रेते-व्यापाऱ्यांकडून पुन्हा रस्त्यावर अतिक्रमण : कारवाईलाही होतोय विरोध
बेळगाव : शहरातील खडेबाजार, भेंडीबाजार, पांगुळ गल्लीत वाहतूक पोलीस आणि महापालिकेच्यावतीने बुधवारी पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. कारवाईवेळी विक्रेते व व्यापाऱ्यांकडून आक्षेप घेण्यात आल्याने पोलीस व व्यापाऱ्यांमध्ये काहीवेळ वादावादीचा प्रसंग घडला. त्यानंतर पोलिसांनी रस्त्याच्याकडेला आरेखन करून द्यावे, त्यानुसार आम्ही व्यवसाय करू असे व्यापाऱ्यांनी सांगितले. कारवाईवेळी दुकानाबाहेर, तसेच रस्त्यावर करण्यात आलेले अतिक्रमणातील साहित्य जप्त करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून वाहतूक पोलीस आणि महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून मुख्य बाजारपेठेसह शहर व उपनगरात सातत्याने अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जात आहे. मात्र विक्रेते व व्यापाऱ्यांकडून पुन्हा अतिक्रमण केले जात आहे. खडेबाजार व पांगुळ गल्लीत गेल्या चार महिन्यांत पाचहून अधिकवेळा कारवाई करण्यात आली आहे. मात्र तेथील विक्रेते व व्यापाऱ्यांकडून पुन्हा अतिक्रमण केले जात आहे. विशेषकरून पांगुळ गल्लीत वारंवार अतिक्रमण करण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे बुधवारी पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली.
गणपत गल्लीच्या कोपऱ्यापासून अधिकाऱ्यांनी कारवाईला सुरुवात केली. त्यानंतर भेंडीबाजारच्या कोपऱ्यापर्यंत कारवाई करण्यात आली. खडेबाजारमधील रस्त्यावर पुन्हा दोन्ही बाजूंनी अतिक्रमण करण्यात आले होते. त्यामुळे ते अतिक्रमण हटविण्यात आले. पांढऱ्या पट्ट्याच्या बाहेर थाटण्यात आलेले साहित्य जप्त करण्यात आले. त्यानंतर भेंडीबाजारमध्येही कारवाई करण्यात आली. तेथील अतिक्रमण हटवून साहित्य जप्त करण्यात आले. वारंवार कारवाई करूनही पांगुळ गल्लीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याठिकाणीही कारवाई करून साहित्य जप्त करण्यात आले. पोलीस व महापालिकेकडून पुन्हा कारवाई करण्यात आल्याने अतिक्रमण करण्यात आलेल्या विक्रेते व व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. सततच्या कारवाईमुळे विक्रेते व व्यापाऱ्यांनी विरोध केल्याने काहीवेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अधिकाऱ्यांनी रस्त्याच्याकडेला आरेखन करून द्यावे, त्यानुसार व्यवसाय केला जाईल, अशी मागणी यावेळी करण्यात आली.