कणबर्गी गावातील चक्कर लाईन रस्त्यावर अतिक्रमण
काही जणांनी रस्ता बंद केल्यामुळे नागरिकांची होतेय गैरसोय : ग्रामस्थ आंदोलन छेडण्याच्या तयारीत
वार्ताहर/किणये
कणबर्गी गावातील चक्कर लाईन रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना शेतकऱ्यांना व जनावरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वर्षापासून सदर चक्कर लाईनचा रस्ता सुरू होता. मात्र तो काही जणांनी बंद केला असल्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय निर्माण झाली आहे. संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी याकडे त्वरित लक्ष देऊन योग्य तो तोडगा काढावा. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
कणबर्गी गावातील बस स्टॉपजवळ सरकारी दवाखाना आहे. त्याच्या बाजूने व शांतीसागर गल्लीच्या मागच्या बाजूने चक्कर लाईनचा रस्ता आहे. सदर चक्कर लाईन रस्त्याची नोंद ही सरकारी नकाशातसुद्धा आहे, असे इथल्या नागरिकांचे म्हणणे आहे. मागील दोन पिढ्यांपासून शांतीसागर गल्लीच्या पाठीमागून गेलेल्या या चक्कर लाईन रस्त्याचा वापर गावकरी करतात. या रस्त्याचा अधिकतर उपयोग शांतीसागर गल्लीतील नागरिकांना होतो. या गल्लीतून या रहिवाशांची वाहने शेत शिवाराकडे ये-जा करतात. तसेच जनावरांना घेऊन जाण्यासाठी या रस्त्याचा उपयोग करण्यात येतो.
शिवाराकडे शेणखत नेण्यासाठी, शेतातील विविध पिकांची वाहतूक याच चक्कर लाईन रस्त्यावरून करण्यात येते. मात्र चक्कर लाईन रस्ता बंद केला असल्यामुळे गल्लीतील शेतकऱ्यांची व रहिवाशांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. 1996-97 साली माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्या विशेष प्रयत्नातून महानगरपालिकेमार्फत सदर चक्कर लाईन रस्ता केला होता. मात्र 2016 पासून काही जणांनी या रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. सध्या गोकाक रोडवर वाहनधारकांची वर्दळ वाढली आहे. तसेच हा रस्ता अरुंद आहे. त्यामुळे शांतिसागर गल्लीतील नागरिकांसाठी हा चक्कर लाईनचा रस्ता महत्त्वाचा ठरत आहे.
संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी चक्कर लाईन रस्त्याची पाहणी करून योग्य तो तोडगा काढावा. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा या गल्लीतील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी दिला आहे. जगदीश गौडा, बबन मलाई, संजय मलाई, प्रशांत मुचंडीकर, चंद्रकांत मलाई, बसवंत कडलिकर, बाबू मलाई आदींसह गल्लीतील नागरिकांनी रविवारी या चक्कर लाईन रस्त्यासंदर्भात चर्चा करून यावर योग्य तो तोडगा काढण्यासंदर्भात नागरिकांच्या सह्यांचे निवेदन तयार केले आहे व हे गावकरी आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.