रस्त्याच्या दुतर्फा झुडपे-गवताचे अतिक्रमण
बेकिनकेरेपर्यंतचा रस्ता दिसत नसल्याने अपघातात वाढ
वार्ताहर/उचगाव
उचगाव पेट्रोलपंप (तळोली) ते बेकिनकेरेपर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपे आणि गवत वाढल्याने वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच त्या भागात फिरणाऱ्या बेवारस कुत्र्यांपासूनचा त्रास वाढला आहे. त्यामुळे रस्त्यावर आडवी येणारी कुत्री तसेच वळणाच्या ठिकाणी वाढलेले गवत यामुळे वाहने चालविताना अडथळे येऊन अपघातात वाढ झाली आहे. रस्त्याच्या दुतर्फा कुंपण आणि गवताने अतिक्रमण केल्याचे निदर्शनास येत आहे. तरी सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने हे काटेरी कुंपण आणि वाढलेले गवत काढावे अशी मागणी या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रवासी आणि नागरिकांनी केली आहे. उचगाव कोवाड हा कर्नाटक आणि महाराष्ट्र अशा दोन राज्यांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. या मार्गावरुन हजारो प्रवाशांची रोज ये-जा असते.
मात्र या रस्त्यावरील बसुर्ते फाटा ते बेकिनकेर गावाजवळील नाला या पट्ट्यात रस्त्याच्या दुतर्फा सर्वाधिक काटेरी झुडपांनी रस्त्यावरच अतिक्रमण केले आहे. यामुळे रस्त्याची ऊंदी कमी झाली असून, वाहनचालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या भागातील तुरमुरी कचरा डेपोतील कुत्री सातत्याने खाली उतरुन वाहतुकीला अडथळे करत असतात. त्यातच रस्त्याच्या बाजूचे काटेरी कुंपण आणि गवत भर घालत असल्याने आणि रस्त्याचा अंदाज येत नसल्याने अचानक ही कुत्री वाहनांच्या आडवी आल्याने अपघात होत असतात. यामध्ये काही वाहन चालक गंभीर जखमीही झाल्याचे समजते. रात्रीच्या ये-जा करणाऱ्या अशा प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने या रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली काटेरी कुंपण, गवत तसेच वाढलेल्या झाडांच्या फांद्या तोडून हा मार्ग मोकळा करावा अशी मागणी प्रवासी आणि नागरिकांतून करण्यात येत आहे.