For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिंडलगा कलमेश्वर मंदिरसमोरील अतिक्रमण हटविले

11:55 AM Jul 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
हिंडलगा कलमेश्वर मंदिरसमोरील अतिक्रमण हटविले
Advertisement

ग्रामपंचायतीचा पुढाकार : लावलेला फलक-खांब केला बाजूला : गाव एकसंघ-शांततेत राहण्यासाठी स्तुत्य उपक्रम

Advertisement

वार्ताहर /हिंडलगा

येथील कलमेश्वर मंदिराची जुनी संरक्षक भिंत जीर्ण झाल्याने भिंतीचा जीर्णोद्धार चालू केला. बांधकाम चालू केल्याने कंत्राटदार सुनील चौगुले व बांधकाम मेस्त्राr आपटेकर यांच्यावर खटला दाखल केला. यानंतर ग्रामस्थ, देवस्की पंच व जीर्णोद्धार कमिटीने ग्रामपंचायतीला याबाबत निर्णय घेण्याबाबत विनंती केली. दि. 9 रोजी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतला निर्णय घेण्यासंदर्भात अध्यक्षा मीनाक्षी हितलमणी यांच्याकडे निवेदन देऊन तातडीची बैठक घेण्यासंदर्भात विनंती केली असता अध्यक्षांनी 10 रोजी सकाळी सर्व सदस्य, ग्रामस्थ, देवस्की पंचकमिटी, जीर्णोद्धार कमिटी यांना कार्यालयात बोलवण्यात आले. बैठकीत चर्चा होऊन ज्यांनी फलक व खांब रोवले आहेत त्याला आक्षेप घेऊन ते काढण्याबाबत सर्वानुमते निर्णय घेतला. त्यानुसार तो फलक व खांब हटविले. गाव शांततेत असताना एका व्यक्तीमुळे अशांतता माजवण्याचा प्रयत्न झाल्यामुळे हा विषय सर्वत्र चर्चेचा ठरला. येथील पुरातन कलमेश्वर मंदिर या भागातील जागृत देवस्थान आहे. मंदिर पूर्वजांनी केव्हा बांधले होते, याबाबत नोंद नाही. परंतु भाविकांची श्रद्धा या मंदिरावर असल्याने बऱ्याच भाविकांनी गावातील जाणकार व्यक्तिंना मंदिराचा जीर्णोद्धार करण्याबाबत जागृती केली.

Advertisement

यावेळी गावातील युवकांनी संघटित होऊन 2004 साली कलमेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. या कमिटीला मार्गदर्शक म्हणून माजी आमदार मनोहर किणेकर होते व जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष म्हणून हिंडलगा ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष नागेश मनोळकर यांची नेमणूक केली गेली. यावेळी या मंदिराला जवळजवळ 45 लाख खर्च आला आहे. मंदिराचा जीर्णोद्धार केल्यानंतर आजतागायत गेली वीस वर्षे या ठिकाणी महाशिवरात्रीला महाप्रसादाचे आयोजन कमिटी व ग्रामस्थ करतात. महाप्रसादाच्या शिल्लक रकमेतून मंदिर सभोवती संरक्षक भिंत बांधण्यासाठी कमिटीने गावकरी व देवस्की पंचांना विश्वासात होऊन सुऊवात केली. काम चालू झाल्यानंतर लागलीच गावातील एका व्यक्तीने मंदिर समोरील जागेवर आपला हक्क असल्याचे सांगून काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. त्या व्यक्तीला सरकारी मोजणी केल्यास आपली जागा जितकी भरेल तितकी सोडण्याची गावकऱ्यांनी तयारी दर्शवली. तरीही तेथे उपस्थित असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांवर कोर्टात दावा दाखल केला. यामध्ये ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र कुद्रेमणीकर, अनिल हेगडे व जीर्णोद्धार कमिटीचे सेक्रेटरी प्रकाश बेळगुंदकर तसेच मंदिराच्या शेजारी असणाऱ्या घरमालकांवर खटला दाखल केला आहे.

मोजणी करण्याचे आश्वासन

मंदिराच्या बांधकामात अडथळा आणल्यानंतर ग्रामपंचायतमध्ये तक्रार नोंद केली. त्यावेळी ग्राम. पं. सदस्य रामचंद्र मनोळकर यांनी गावकऱ्यांना व अतिक्रमण केलेल्या व्यक्तीला जागेसंदर्भात कागदपत्र हजर करण्यास सांगून ग्राम. पं. तर्फे मोजणी करण्याचे आश्वासन दिले होते. बैठकीला सदस्य नागेश मनोळकर, रामचंद्र मनोळकर, रामचंद्र कुद्रेमणीकर, प्रवीण पाटील, चंद्रकांत बांदिवडेकर, भाग्यश्री कोकितकर, आरती कडोलकर, यल्लाप्पा काकतकर, विठ्ठल देसाई, देवस्की पंच गजानन काकतकर, संदीप मोरे, नागेश किल्लेकर, गुंडू मेणसे, मनोहर नाईक, नागेश सरप, संजय काकतकर, म. ए. समिती युवा आघाडी  अध्यक्ष विनायक पावशे, प्रवीण देवगेकर, लक्ष्मण कडोलकर, ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष राजू जाधव, चंद्रकांत अगसगेकर उपस्थित होते.

जाणूनबुजून काम बंद पाडण्याचा प्रयत्न

जागेबाबत अद्याप कुणी गावकऱ्यांनी किंवा इतरांनी हक्क सांगितला नव्हता. म्हणून शेकडो वर्षापासून पंचक्रोशीतील भाविक दर सोमवारी येथे दर्शनासाठी येतात. तसेच या जागेवर ज्या व्यक्तीने हक्क दाखवला आहे. त्यांच्या आजोबांनी किंवा वडिलांनी याबाबतची नोंद यापूर्वीच्या कमिटीला, गावकऱ्यांना दिलेली नाही. जागा पूर्वजांनी विकल्याचे सांगितले जात असून, जाणूनबुजून या ठिकाणी काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे.

- रामचंद्र कुद्रेमणीकर-माजी ता. पं. सदस्य व विद्यमान ग्राम. पं. सदस्य 

गावकऱ्यांचा निर्णय योग्यच

सदर जागा कलमेश्वर मंदिराची असून, याबाबतचे सर्व कागदपत्र माझ्याकडे आहेत. आम्ही जागा वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. सर्व्हे नंबर 65 बार 1 याबाबत दावा केला जातो. 61 नंबर सर्व्हे मध्ये मंदिर आहे. या जागेवरच हे मंदिर आहे. ही जागा हडप करण्यासाठी प्रयत्न करत असताना ग्रामस्थांनी एकत्र येऊन जागा वाचवण्याचा जो प्रयत्न केला तो गावच्या दृष्टीने चांगला निर्णय घेतला आहे.

- देवस्की पंच, गजानन काकतकर 

Advertisement
Tags :

.