For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

यमनापूर गणपत गल्लीत भाजी विक्रेत्यांकडून अतिक्रमण

10:10 AM Nov 25, 2023 IST | Tarun Bharat Portal
यमनापूर गणपत गल्लीत भाजी विक्रेत्यांकडून अतिक्रमण
Advertisement

रस्त्यावरच भाजीविक्रीचे खोके उभारल्यामुळे वाहनधारक-पादचाऱ्यांसाठी रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा

Advertisement

वार्ताहर /कंग्राळी बुद्रूक

यमनापूर येथील गणपत गल्लीमध्ये किरकोळ भाजीविक्रेत्यांनी रस्त्यावरच भाजीविक्रीचे खोके उभारल्यामुळे सदर ठिकाण वाहनधारक व पादचाऱ्यांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे.महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे त्वरित लक्ष देऊन रस्ता वाहतुकीला सुरळीत करण्याची मागणी वाहनधारक व नागरिकांतून करण्यात येत आहे. यमनापूर येथील गणपत गल्लीमध्ये कोरोना काळापासून किरकोळ भाजी विक्रेत्यांनी भाजीपाला विक्रीची बाजारपेठ तयार केली आहे. यामुळे परिसरातील रहिवाशांसाठी रोज ताजी भाजी मिळण्याची सोय झाली आहे. ही चांगली गोष्ट आहे. प्रारंभी सदर भाजीविक्रेते उघड्यावर भाजीविक्री करत होते. परंतु नंतर एका भाजीविक्रेत्यानी गटारीशेजारी छताला पत्रे घालून खोका उभा केला. त्यानंतर एकाचे पाहून एक असे सर्व भाजीविक्रेत्यांनी छताला पत्रे घालून गणपत गल्लीमध्ये भाजीविक्रीची शेडची निर्मिती केल्याचे दिसून आले. काही विक्रेत्यांनी तर रस्त्यावर तयार पत्र्याच्या शेडची उभारणी केली आहे. यामुळे भाजीविक्रेत्यांकडून रस्त्यावर अतिक्रमण झाले. यामुळे सदर ठिकाण वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळा बनला असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Advertisement

अपघातांची मालिका सुरूच

भाजीविक्रेत्यांकडून गटारीच्या बाजूला रस्त्यावरच पत्रे घालून भाजीविक्रीसाठी शेडची निर्मिती केल्यामुळे वाहनधारकांना वळणावर कंग्राळी बुद्रूक, गौंडवाड किंवा यमनापूरकडून येणारा-जाणारा वाहनधारक दिसत नसल्यामुळे वरचेवर दुचाकीस्वारांचे अपघात घडत आहेत. गत सोमवारी तर कंग्राळी बुद्रुक येथील ओमकार सोसायटीचे संचालक मल्लाप्पा येळ्ळूरकर यांच्या दुचाकी वाहनाला दुसऱ्या दुचाकी वाहनधारकाने धडक दिल्यामुळे त्यांना चांगला मुका मार लागल्यामुळे ते कोमामध्ये गेले. त्यांना केएलई हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचेही नागरिकांकडून सांगण्यात आले. एखाद्याचा जीव गेल्यावर महानगरपालिका अधिकाऱ्यांना जाग येणार की काय? अशीही प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहेत.

महानगरपालिकेला परवानगी देता येते का?

नागरिकांना दैनंदिन सकाळ संध्याकाळच्या आहारामध्ये भाजी ही गरजेची आहे. अशा भाजी विक्रेत्यांमुळे नागरिकांना दररोज ताजी भाजी मिळणे हीसुद्धा चांगली गोष्ट आहे. परंतु आपल्या व्यापारामुळे इतर नागरिकांना त्रास होऊ नये याचे भानसुद्धा विक्रेत्यांनी ठेवणे गरजेचे आहे. परंतु या रस्त्यावर तर चक्क छताला पत्रे घालून शेड तयार केले आहे. काही विक्रेत्यांनी चक्क खोकेच उभे केले आहेत. तेव्हा हे सर्व कुणाच्या आशीर्वादाने होत आहे, अशी नागरिकांतून चर्चा होत आहे. तेव्हा भाजीविक्रेत्यांनी रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवासीवर्गाला त्रास होऊ नये याची जाणीव ठेवून व्यापार  करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. तेव्हा महानगरपालिकेच्या लोकप्रतिनिधीनी व अधिकाऱ्यांनी सदर मार्केटची पाहणी करून भाजीविक्रेत्यांकडून रस्त्यावर होणारा अडसर दूर करून दिलासा देण्याची मागणी करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.