ऑनलाईन पेमेंटसाठी वीज ग्राहकांना प्रोत्साहन
वीज खात्याकडून सूट जाहीर
पणजी : वीज बिल भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांसाठी वीज खात्याने बिलाच्या रकमेत सूट देण्याची योजना जाहीर केली आहे. त्यासंबंधी संयुक्त वीज नियामक मंडळाने अधिसूचनेतून माहिती दिली आहे. त्यानुसार कमी दाबाच्या आणि उच्च दाबाची वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एकूण बिलाच्या रकमेत अनुक्रमे 0.5 टक्के आणि 0.25 टक्के अशी सूट देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. वीज खात्याने यापूर्वीही अशाच प्रकारची योजना जाहीर केली होती. त्याअंतर्गत अंतिम तारखेच्या 7 दिवस आधी बिल भरणाऱ्या ग्राहकांना एकूण रकमेत 1.25 टक्के सूट देण्यात येत होती. दरम्यान, सदर नवीन अधिसूचनेचा खात्यातील अधिकारी सध्या अभ्यास करत असून ही सवलत लगेचच लागू करता येईल की नाही त्याबद्दल विचार करण्यात येणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
वीज जोडणीसाठी कालमर्यादा
मंडळाच्या नवीन अधिसूचनेनुसार ग्राहक आता अल्पावधीत नवीन वीज जोडणी मिळवू शकणार आहेत. मंडळाने अर्ज मंजूर करण्यासाठी कालमर्यादाही निर्धारित केली आहे. गोव्यासह अन्य केंद्रशासित प्रदेशांनाही लागू होणाऱ्या या अधिसूचनेनुसार मेट्रो शहरातील ग्राहकांना अर्ज भरल्याच्या तारखेपासून तीन दिवसांत, पालिका क्षेत्रातील ग्राहकांना सात दिवसांच्या आत तर ग्रामीण भागातील लोकांना 30 दिवसांच्या आत वीज जोडणी मिळू शकणार आहे. त्यासाठी अर्ज सर्व बाबतीत परिपूर्ण असणे आवश्यक आहे. पूर्वी असे अर्ज मंजूर करण्यासाठी किंवा पुढील प्रक्रिया करण्यासाठी कोणतीही कालमर्यादा नव्हती. या अधिसूचनेंतर्गत ग्राहकांना आणखी एक फायदा होऊ शकतो तो म्हणजे एखाद्याच्या वीज वापर क्षमतेचा विस्तार किंवा ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवायची असल्यास ते काम 90 दिवसांच्या कालमर्यादेत पूर्ण करण्यात येणार आहे.त्यामुळे खास करून हाऊसिंग सोसायटीसारख्या ठिकाणी राहणारे ग्राहक तसेच व्यावसायिक वापरकर्त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, अशी माहिती सदर अधिकाऱ्याने दिली.