For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ग्रामीण भागातील साहित्यिक, कवींना प्रोत्साहन द्या

10:17 AM Jan 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
ग्रामीण भागातील साहित्यिक  कवींना प्रोत्साहन द्या
Advertisement

संमेलनाध्यक्ष बाबासाहेब सौदागर यांचे प्रतिपादन : कुद्रेमनी येथे 18 वे मराठी साहित्य संमेलन उत्साहात : कष्टकरी लोकांच्या मनात साहित्यिकांनी आनंद लहरी निर्माण करणे आवश्यक

Advertisement

आण्णाप्पा पाटील/कुद्रेमनी

साहित्यिकांनी सर्वसामान्य लोकांना कळेल अशा पद्धतीचे लेखन केले पाहिजे. कष्टकरी लोकांच्या मनात साहित्यिकांनी आनंद लहरी निर्माण करण्याचे कार्य केले पाहिजे. अन्याय होत असेल तर प्रतिकार करण्याच्या मशाली पेटविल्या पाहिजे. त्या जिवंत ठेवल्या पाहिजेत. लिहिण्यासाठी, कवितेसाठी मनाचा दृढ निश्चय केला पाहिजे. तेव्हांच चांगले साहित्य आपण समाजाला देऊ शकतो. ग्रामीण भागातील कवी, साहित्यिकांना म्हणावी तशी प्रसिद्धी मिळत नाही. आपली ग्रामीण संस्कृती, मातृभाषा टिकविण्यासाठी ग्रामीण भागातील साहित्यिक हा महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे समाजातील सर्व स्तरातून ग्रामीण भागातून कवी, लेखक, साहित्यिकांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. असे प्रतिपादन कुद्रेमनी येथील 18 व्या मराठी साहित्य संमेलनात श्रीरामपूर येथील प्रसिद्ध गीतकार कवी, साहित्यिक बाबासाहेब सौदागर यांनी केले.

Advertisement

कुद्रेमनी येथील बलभीम साहित्य संघ व ग्रामस्थांच्यावतीने रविवारी 18 व्या मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. या संमेलनात बाबासाहेब सौदागर हे संमेलनाध्यक्ष म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले, समाजात पुरस्कार देणारे फार कमी मात्र तिरस्कार करणारे अधिक आहेत. यांच्याकडे लक्ष देऊ नका. ग्रामीण भागातील लेखकांनी लिहित रहावे, थांबू नये. आपले स्वप्न साहित्य व कवितेच्या माध्यमातून समाजासमोर मांडले पाहिजे. कारण साहित्य हे तिर्थक्षेत्राप्रमाणे पवित्र आहे. साहित्याच्या माध्यमातून माणसाला जगण्याची दिशा मिळते, असे ते म्हणाले. शहरातल्या काही माणसांनी आपल्या घराचा आणि मनाचा दरवाजा बंद केला. मात्र खेड्यातल्या माणसांनी तो जपला आहे. समाजात सांस्कृतिक अपंगत्व वाढू लागले आहे. ते कमी केले पाहिजे. कवींनी कविता ही गंभीरपणाने लिहिली पाहिजे. कविता हसण्यावारी घेऊ नका, माणसाला तीन प्रकारच्या नशा होतात. दारू, गद्य आणि पद्य. दारूमुळे स्वत:सह समाजाचे नुकसान होते. तर जे गद्य आणि पद्य याची नशा करतात. यातून थोर साहित्यिक निर्माण होतात. मराठी भाषेतील शब्द फार गंमतीशीर आहेत. अनेक शब्द उलटे करून वाचले तर त्याचा अर्थ वेगवेगळा निघतो. अलिकडे कोण म्हणतात मराठी भाषा संपत आली मात्र जोपर्यंत आपण आपल्या आईला आई म्हणतो तोपर्यंत ती भाषा टिकूनच राहणार असे त्यांनी सांगितले.

सौदागर यांनी आपल्या भाषणाच्या प्रारंभी विठ्ठल व शेतकऱ्यांची आणि दुष्काळाची व्यथा मांडणारी कविता सादर केली. याचबरोबर सासू आणि सून यांच्यामधील नाते कसे घट्ट करता येईल त्याबद्दल माहिती दिली. जन्म आणि मृत्यू यातील अंतर केवळ एक श्वासाचे आहे. यावर आधारित बहिणाबाईंची कविता सादर केली. आणि माणसाने कठीण परिस्थितीत हताश, निराश न होता धैर्याने संकटाचा सामना केला पाहिजे, असे सांगितले. वाचनाची आवड होती. लहानपणी तमाशे पाहिले, कीर्तन पाहिले आणि यातील संस्कार आपल्यावर घडत गेले. त्यानंतर गीतकार व्हायचे स्वप्न उराशी बाळगून कोल्हापूर गाठले. या प्रवासात बऱ्याच चढ उतार आल्या. मात्र समुद्राच्या तळाला जाऊन मोती वेचून आणण्याची जिद्द मनात होती. त्यामुळेच आज गीतकार बनलो असे त्यांनी सांगितलें. तसेच गाण्यावर जगलो आणि सुंदर संसार केला, असे सांगितले.  संघर्षाशिवाय हर्ष नाही. ताणतणावामध्येही निश्चित वृत्तीने उभे राहिले पाहिजे, असे सांगितले. झाले ‘शहीद, ज्यांचे पूर्ण व्हावेत हेतू, यावे पूर्ण नव्याने स्वातंत्र्य देवते’ हे गीत सादर केले. अलिकडे जुन्या विविध कादंबऱ्यांवर चित्रपटाची निर्मिती होऊ लागली आहे. या कादंबरी महत्त्वाच्या ठरू लागल्या आहेत असे सांगितले. त्यांनी विविध कविताही सादर करून उपस्थितांची वाहव्वा मिळविली. तसेच मराठी भाषचे जतन करा, शब्दांची पूजा करा, असेही सौदागर यांनी सांगितले.

मराठी भाषेला जगवूया, समृद्ध करूया

गेली 68 वर्षे मराठी भाषेसाठी आम्ही लढतो आहे. मराठी भाषा संस्कृती टिकवण्यासाठी हे कुद्रेमनीचे संमेलन लोकवर्गणीतून सुरू आहे. मराठी भाषेला जगवूया, समृद्ध करूया, अशी मराठीची तळमळ संमेलनाच्या स्वागताध्यक्षा डॉ. मधुरा राम गुरव यांनी आपल्या भाषणातून सांगितली. सीमाबांधवांची व्यथा आपल्या साहित्यातून लिहा महाराष्ट्रातील साहित्यिकांनी सीमाबांधवांची व्यथा आपल्या साहित्यातून लिहावी, असे सरस्वती पाटील यांनी आपल्या भाषणातून सांगितले.

कवी संमेलनात एकापेक्षा एक कविता सादर

मनुष्य प्राणी अनेक विचारांमुळे असमाधानी बनला आहे. चिंता न करता आपले आत्मबळ वाढविले पाहिजे. आपण जिवंत आहोत, ज्वलंत आहोत हे महत्त्वाचे आहे. जेव्हा आपल्या दु:खावर रडता येत नाही, भांडता येत नाही तेव्हा आपण आपल्या दु:खावर हसले पाहिजे. यामुळे न कळत दु:खाचा भार कमी होतो.  आपल्याला माणूस म्हणून जगण्याची संधी मिळाली आहे. त्यासाठी संघर्ष केला पाहिजे. कविता माणसुकी जपण्याचे कार्य करतात. मिळालेल्या वेळेत फुलून गेले पाहिजे. सकारात्मक बनण्याचा प्रयत्न करा असे संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात मंगळवेढा येथील कवी इंद्रजित धुळे यांनी सांगितले. संमेलनात दुसरे सत्र कवी संमेलन झाले. या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी मुंबई येथील कवियत्री डॉ. पल्लवी परूळेकर या होत्या. सोनेरी दिवसांचा एक होता काळ व कलेसाठी वाजविलेली टाळी या दोन कविता सांगली येथील संतोष काळे यांनी सादर केल्या. तसेच कविता जगतात तेच कविता लिहू शकतात. कविताही काळजातून आली पाहिजे. असे त्यांनी सांगितले. शाईचे पेनाचे केवळ झरणे नाही आणि खोडत बसणे म्हणजे कविता नाही. याचबरोबर  कविता म्हणजे खेळणं नसतं भाऊ, या कविता राधानगरी येथील विश्वास पाटील यांनी सादर केल्या. तसेच बाळाचा जन्म झाल्यावर आईला किती आनंद होतो ही कविताही त्यांनी सादर केली. कुद्रेमनी गावच्या अमृत पाटील यांनी कवितेचे जंगल व जीवन असे नाव या दोन कविता सादर केल्या.

18 वर्षांपासून मराठी साहित्याचा जागर

कुद्रेमनी गावात गेल्या 18 वर्षांपासून मराठी साहित्याचा जागर होतो आहे. येथील ग्रंथदिंडीत आणि या संमेलनात साहित्याचा राम या कुद्रेमनीमध्येच आम्हाला दिसला. असे डॉ. पल्लवी परूळेकर यांनी सांगितले. जन्मजन्माची शिदोरी तसेच चंद्र होऊनी जातो. अशा कविता सादर केल्या. मराठी मातीचा गंध येथे अनुभवायला मिळाला, असेही परूळेकर यांनी सांगितले. गावातील विद्यार्थिनी श्रावणी पाटील हिने प्रकृती ही कविता सादर केली.

जुगलबंदी भारूडातून सादर केले समाज प्रबोधन

संमेलनाच्या शेवटच्या सत्रात सांगोला येथील संदीप मोहिते व अण्णा चव्हाण यांनी जुगलबंदी भारूड सादर करून समाजप्रबोधन केले. आणि सुमारे दोन तास रसिकांना खळखळून हसवितानाच वास्तविक जीवनाची जाणीव करून दिली. संतसाहित्य याचे महत्त्व पटवून दिले. करितो नमन तुला गणराया, गण नाचत आला, ही दोन गीते भारूडच्या प्रारंभी सादर केली आणि एकापेक्षा एक जुगलबंदीची भजने सादर करून उपस्थितांची वाहव्वा मिळविली. संतानी समाजाला दिशा दाखविली आहे.

Writers should write in a way that common people can understand. Literature should work to create waves of happiness in the mindsचांगला समाज एकत्र यावा यासाठी संत साहित्य महत्त्वाचे आहे. आपल्यातील मीपणा बाजूला करा. मीपणा कमी झाला की, मोक्ष प्राप्तीचा मार्ग सापडतो. ‘जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा’ याप्रमाणे कार्य करा, असे अण्णा चव्हाण यांनी सांगितले. मायेच्या मोहजाळात अडकू नका, रावणाची लंका हनुमतांने जाळली त्यामुळे गर्व करू नका, स्त्राrभ्रुण हत्या थांबली पाहिजे यासाठी समाजातून प्रयत्न करा, असे चव्हाणांनी सांगितले. ‘नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ, सावधान हा देह नाशिवंत आहे, त्यामुळे चांगले कर्म करा, चांगले ध्येय बाळगा’ असे संदीप चव्हाण यांनी सांगितले. दोघांनीही ऐकापेक्षा एक सरस असे भारूड भजन सादर केले.

Advertisement
Tags :

.