शेतकऱ्यांना रसायनमुक्त शेतीसाठी प्रोत्साहित करा
जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांची सूचना : कृषी खात्याच्या विविध योजनांची विकास आढावा बैठक
बेळगाव : राष्ट्रीय नैसर्गिक कृषी अभियानांतर्गत शेतकऱ्यांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देऊन त्यांना रसायनमुक्त शेतीसाठी प्रोत्साहित करावे. तसेच सुरक्षित पिकांचे उत्पादन आणि मातीची सुपिकता वाढविण्यासाठी मेहनतीपर काम करावे, अशी सूचना जि. पं. चे मुख्य कार्यनिर्वाहक अधिकारी राहुल शिंदे यांनी केली. जि. पं. सभागृहात आत्मा योजना, राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा, राष्ट्रीय खाद्यतेल अभियान, पीक विकास कार्यक्रम, हायटेक हार्वेस्टर हब, कृषीभाग्य योजना, शेतकरी समृद्धी योजना, नैसर्गिक कृषी अभियान, कृषी यंत्रसामग्री योजना आदींसह कृषी विभागाच्या विविध योजनांच्या विकास आढावा बैठकीत ते बोलत होते.
शिंदे म्हणाले, शेतकऱ्यांना नियमांनुसार जास्तीत जास्त लाभ मिळावा, यासाठी कृषी विभाग, ग्रामीण विकास पंचायतराज व कृषी विभागाने एकजुटीने काम करावे. जेणेकरून शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळेल. गेल्यावर्षी जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा जास्त काम करणाऱ्या हायटेक वनीकरण प्रकल्पाचे त्यांनी कौतुक केले. तसेच या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला असून शेतकरीही समाधान व्यक्त करत आहेत. शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रकारच्या समस्या असल्यास त्याचे निवारण करण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी दोन ग्रामीण बाजारपेठा निर्माण करण्याचे निर्देश नाबार्ड व्यवस्थापकांनी दिले आहेत. इतर विभागाच्या अधिकाऱ्यांनीही यामध्ये सहभागी होऊन याबाबत कार्यवाही करावी. सर्व योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कसा लाभ पोहोचवता येईल, याबाबत उपाययोजना कराव्यात. शेतकऱ्यांना पंतप्रधान जीवन विमा व जीवन ज्योती विमा देण्यात यावा. जिल्ह्यातील शेतकरी कोणत्याही योजनेपासून वंचित राहणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
संजीवनी योजनेंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला शेतकरी उत्पादक गटांना प्राध्यान्याने कार्य देण्यासाठी पावले उचलावीत. कृषी, फलोत्पादन व ग्राम पंचायतींनी निर्माण केलेल्या सर्व कृषी तलावांभोवती तारेचे कुंपण बंधनकारक करावे. शेतकरी व पशूधनाची सुरक्षा निश्चित करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. तसेच याबाबत जागरुकता करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शंकरगौडा पाटील, कृषी खात्याचे सहसंचालक एच. डी. कोळेकर, फलोत्पादन खात्याचे उपसंचालक महांतेश मुरगोड यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी, शेतकरी उपस्थित होते.