किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांशी चकमक
तीन जवान जखमी : शोध मोहिमेमुळे परिसरात इंटरनेट बंद
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू काश्मीरमधील किश्तवाडच्या डोलगाम भागात शनिवारी सकाळी सुरक्षा दल आणि लपलेल्या दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. हे दहशतवादी गेल्या आठवड्यापासून या भागात लपून बसले होते. काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफ जवानांना डोलगाममध्ये दहशतवाद्यांबद्दल माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाकडून ‘ऑपरेशन त्राशी-1’ ही संयुक्त मोहीम हाती घेण्यात आली. यावेळी झालेल्या संघर्षात सध्या तीन जवान जायबंदी झाल्याचे सुरक्षा दलाकडून सांगण्यात आले.
गेल्या तीन दिवसांपासून सुरू झालेली ही मोहीम शनिवारीही सुरू होती. या मोहिमेसाठी विशेष सैन्यबल मागविण्यात आले आहे. या कारवाईदरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून सिंहपोरा, चिंगम आणि चतरू या भागातील 6 किलोमीटरच्या परिसरात मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. या भागात बर्फवृष्टी सुरूच असूनही सुरक्षा दलांनी दोन फुटांपेक्षा जास्त बर्फातून दहशतवाद्यांचा शोध सुरू ठेवला आहे.
15 दिवसांत या भागात दहशतवाद्यांशी झालेली ही चौथी चकमक आहे. 18 जानेवारी रोजी ऑपरेशन त्राशी-1 सुरू झाले. मंद्राल-सिंघपोरा जवळील सोनार जंगलात झालेल्या चकमकीत एक पॅराट्रूपर हुतात्म झाला. तसेच अन्य सात सैनिक जखमी झाले. तथापि, घनदाट जंगलाचा फायदा घेत दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले होते.
22 जानेवारी रोजी माली दाना टॉप येथे आणि 25 जानेवारी रोजी जानसीर-कांदीवार येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये आणखी दोन चकमकी झाल्या, परंतु दहशतवादी पुन्हा एकदा जंगलाच्या आतील भागात पळून गेले. सुरक्षा दलांनी या भागात कार्यरत असलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांवर कारवाई सुरू ठेवल्याने किश्तवाडमध्ये गेल्या सात महिन्यांत सहा चकमकी झाल्या आहेत. हा परिसर दोडा आणि उधमपूर जिह्यांशी संलग्न आहे.