बांदीपोरा येथे दहशतवाद्यांशी चकमक
वृत्तसंस्था / श्रीनगर
जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा येथे भारताचे सैनिक आणि काही दहशतवादी यांच्यात चकमक होत आहे. मंगळवारी रात्री उशीरापर्यंत ही चकमक होत राहिली आहे. बांदीपोराच्या वनविभागात गस्त घालणाऱ्या काही सैनिकांवर दहशतवाद्यांना अचानक गोळीबार केल्याने सैनिकांनीही गोळीबारानेच प्रत्युत्तर दिले. त्यानंतर दहशतवादी पळून गेले. सैनिकांनी त्यांचा पाठलाग करुन त्यांची कोंडी केल्याचे वृत्त देण्यात आले आहे. दहशतवाद्यांची संख्या तीन ते चार असण्याची शक्यता आहे.
श्रीनगरनजीक एका वेगळ्या कायवाईत जम्मू-काश्मीरच्या पोलिसांनी राष्ट्रीय रायफल्स आणि केंद्रीय राखीव पोलिस दलासह हाती घेतलेल्या अभियानात दहशतवादी गटाच्या साहाय्यकाला पकडण्यात आले आहे. त्याचे नाव आशिक हुसेन वाणी असल्याची माहिती देण्यात आली. त्याला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी केली जात आहे. एफआयआर सादर करण्यात आला आहे.
हल्ल्यांच्या संख्येत वाढ
जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक पार पडून नॅशनल कॉन्फरन्सच्या नेतृत्वात नवे सरकार स्थापन झाल्यापासून दहशतवादी हल्ल्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या दोन आठवड्यांमध्ये असे 12 लहान मोठे हल्ले झाले आहेत. या हल्ल्यांमध्ये 8 नागरीक ठार झाले आहेत, तर सैनिकांनी केलेल्या कारवाईत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. दोन सैनिकांनाही हौतात्म्य प्राप्त झाले आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या हल्ल्यासंबंधी चिंता व्यक्त केली असून हल्ले थांबविण्याचे आवाहन केले आहे.