For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत-बांगलादेश सीमेवर घुसखोरांसोबत चकमक

06:26 AM Feb 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
भारत बांगलादेश सीमेवर  घुसखोरांसोबत चकमक
Advertisement

बंगालमधील दिनाजपूरमध्ये हल्ला : एक सैनिक जखमी : एकाला अटक  

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

पश्चिम बंगालमधील भारत-बांगलादेश सीमेवर सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि सीमेपलीकडून येणाऱ्या घुसखोरांमध्ये चकमक झाली. सुरक्षा दलांनी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. मात्र, या चकमकीत एक सैनिक जखमी झाला. एका घुसखोरालाही अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान, सीमेवरील कुंपण तोडलेले आढळले. घटनास्थळावरून काठ्या, धारदार शस्त्रs आणि वायर कटर जप्त करण्यात आले.

Advertisement

चकमकीची घटना दक्षिण दिनाजपूर जिह्यातील सीमेवरील मलिकपूर गावात 4-5 जानेवारीच्या मध्यरात्री घडली. दरोडा आणि तस्करीमध्ये सहभागी असलेल्या टोळीतील अनेक सदस्य बांगलादेशातून भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. रात्री गस्त घालणाऱ्या बीएसएफ जवानांनी घुसखोर बांगलादेशींना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी, घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या लोकांनी सैनिकांवर हल्ला केला. बीएसएफनेही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. हल्लेखोरांनी जवानांचे वाहन हिसकावण्याचा व फोडण्याचा प्रयत्नही केला. दरम्यान, हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी संघावर हल्ला केला. सुरक्षा दलांनी घुसखोरांवर प्रतिहल्ला करताच त्यांनी आपले प्राण वाचवत बांगलादेशच्या दिशेने पळ काढला. मात्र, एकाला पकडण्यात यश आले असून त्याची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. बीएसएफच्या म्हणण्यानुसार, ज्या भागात ही घटना घडली त्या भागात दाट धुके होते.

त्रिपुरा सीमेवरही घुसखोरीचे प्रकार

बांगलादेशातून त्रिपुरामध्ये बेकायदेशीरपणे घुसणाऱ्या एका भारतीय तरुणाला मंगळवारी भारतात घुसताना सीमा सुरक्षा दलाने गोळ्या घालून जखमी केले. संबंधित तरुणाला आगरतळा येथील जीबीपी रुग्णालयात नेण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. संबंधित तरुणाचे नाव अख्तर जमाल रोनी आहे. हा तरुण सोमवारी एका धार्मिक समारंभात सहभागी होण्यासाठी बांगलादेशात गेल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्याच्यासोबत एक महिलाही होती. दोघेही मंगळवारी भारतात परतताना सीमेवर संघर्ष झाला. दोघांनी कुंपण तोडून भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा दलांच्या इशाऱ्यांनंतरही तो थांबला नाही. त्यानंतर सैनिकांनी दोघांवरही प्रत्येकी एक गोळी झाडली. या संघर्षात तरुण जखमी झाला, तर महिला जवळच्या गावात पळून गेली. चौकशीदरम्यान तरुणाने आपण दोघेही पश्चिम बंगालमधील पुटिया गावातील रहिवासी असल्याचे सांगितले.

Advertisement

.