For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एन्काऊंटर नेक की फेक...?

06:18 AM Sep 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
एन्काऊंटर नेक की फेक
Advertisement

बदलापूर अत्याचारप्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटरमधील मृत्यू म्हणजे हैदराबादमधील चकमकीची दुसरी आवृत्तीच म्हटली पाहिजे. या एन्काऊंटरलाही समाजाच्या विविध स्तरांतून पाठिंबा मिळत असून, अक्षरच्या मृत्यूनंतर बदलापूर व अन्य भागांत झालेला जल्लोष हा त्याचाच भाग ठरावा. न्यायालयात आरोप सिद्ध झाल्याशिवाय कोणताही आरोपी हा गुन्हेगार ठरत नाही, असे कायदा सांगतो. मात्र, न्यायास होणारा विलंब तसेच बलात्कारासारख्या गुन्ह्यातील अडचणी बघता पीडितांना न्याय मिळेल, यावर आता बहुतांश समाजाचा विश्वासच उरलेला नाही. त्यामुळेच अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला की करण्यात आला, यामध्ये बहुतांशांना रस दिसत नाही. कालपरवापर्यंत ठाण्यातील एक उपनगर एवढीच काय ती बदलापूरची ओळख. बदलापूर येथील शाळेत अल्पवयीन मुलींवर शिपायाने लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण पुढे आल्यानंतर देशभर त्याचे पडसाद उमटले. या निषेधार्थ येथील जनता थेट रस्त्यावर उतरली. त्यानंतर पोलिसांकडून अक्षयला गजाआडही करण्यात आले. तळोजा तुऊंगात ठेवण्यात आलेल्या अक्षयने गुन्ह्याची कबुली दिल्याचेही सांगण्यात येते. मात्र, चौकशीसाठी नेताना वाटेत त्याने पोलिसांच्या हातातून बंदूक हिसकावून तीन राऊंड फायर केले. त्यावेळी स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी गोळीबार केला व त्यातच अक्षयचा खात्मा झाला, असे म्हटले जाते. मात्र, हा एकूणच घटनाक्रम एखाद्या चित्रपटाच्या कथानकाइतकाच सनसनाटी दिसतो. पोलिसांवर हल्ला करण्याइतपत अक्षयची मजल जाते काय, तो तीन राऊंड फायर करतो काय, हे सगळेच अतर्क्य होय. त्याचबरोबर बंदोबस्तातच आरोपी इतके धाडस दाखवित असेल, तर पोलिसांविषयी काही धाक उरलेला आहे का, असा प्रश्नही उपस्थित होतो. मागच्या काही वर्षांत केवळ एका राज्यातील नव्हे, तर जवळपास देशाच्या सर्वच प्रदेशांतील गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रातील शहरेही त्याला अपवाद राहिलेली नाहीत. रोज कुठे ना कुठे अल्पवयीन मुली वा महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडतात. गँगवार, कोयते नाचवणे, गोळीबार, गाड्यांची तोडफोड हा तर नित्यक्रम बनला आहे. त्यामुळे गृहमंत्रालय व पोलीस प्रशासन कायम टीकेचे धनी ठरते. कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजण्याच्या आजच्या या काळात गुन्हेगाराला, आरोपीला तात्काळ शासन झाले, की लोकांमधून आनंद व्यक्त होताना दिसतो. बदलापूर प्रकरणातही झाले ते बरे झाले, अशीच बव्हंशी भावना दिसते. बदला पुरा, नराधमांना माफी नाही, देवाचा न्याय, अशा फलकांतून वा प्रतिक्रियांतून हेच अधोरेखित होते. यापूर्वी हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवरील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या एन्काऊंटरने देशात खळबळ उडवली होती. पोलिसांनी ज्या ठिकाणी नराधमांनी हे दृष्कृत्य केले, तिथेच आरोपींचा खात्मा केला होता. हा एन्काऊंटर असल्याचे भासविण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात तो बनावट असल्याची माहिती समोर आली होती. यूपी वा अन्य काही राज्यांमध्येही अशा प्रकारचे एन्काऊंटर घडविण्यात आले आहेत. त्यामुळे बदलापूर प्रकरणातही हाच प्रयोग झाला असावा, अशी चर्चा आहे. ती किती खरी किती खोटी, यावर काथ्याकूट होत राहील. मात्र, सध्या यावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झालेल्या दिसतात. या प्रकरणातील मुख्य आरोपींचे एन्काऊंटर करून फरार आरोपींना वाचविण्याचा व हे प्रकरण दडपण्याचा हा प्रयत्न नाही ना, अशी शंका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तर सेनेच्या सुषमा अंधारे यांनी दोन्ही हातात बेड्या ठोकलेला माणूस पोलिसांची बंदूक कसा काढून घेतो, स्वसंरक्षणाचा हा बनाव तर नाही ना, असे प्रश्न उपस्थित केले आहेत. याशिवाय विरोधी पक्षातील अन्य नेत्यांनी व कायदेतज्ञांनी यासंदर्भात विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे पुढच्या टप्प्यात त्याची सत्यासत्यता व तत्सम बाबींसंदर्भातही चौकशांचे फार्स होऊ शकतात. पण, त्यातून फार काही हाती लागण्याची शक्यता नाही. बदलापूर प्रकरणात अक्षय शिंदे यांचे नाव पुढे आले, त्याला अटक झाली. मात्र, त्याला पाठीशी घालणाऱ्या शाळा व्यवस्थापनातील मंडळी वा अन्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. या गुन्ह्यात त्याला आणखी कुणी सहकार्य केले का किंवा कसे, यावरही खरे तर प्रकाश पडायला हवा होता. मात्र, त्याच्या एन्काऊंटरने आता सगळ्याच शक्यता मावळलेल्या दिसतात. अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे प्रकरण हे अतिशय गंभीरच आहे. कोवळ्या कळ्यांना खुडण्याचा हा गुन्हा अक्षम्यच ठरतो. त्यामुळे अशा नराधमांना फाशी किंवा त्यापेक्षा कठोर शिक्षा झाली पाहिजे, याबाबत कोणतेही दुमत असण्याचे कारण नाही. परंतु, राज्याराज्यांमध्ये न्यायालयीन प्रक्रियेद्वारे शासन होण्याऐवजी चकमकींचे माध्यम निवडले गेले, तर त्यातून आणखी गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. उद्या लोकच कायदा हातात घ्यायलाही कमी करणार नाहीत. तसे काही प्रकारही यापूर्वी घडले आहेत. हे रोखायचे असेल, तर जलद गतीने आरोपींवर दोषारोपपत्र दाखल होणे, त्यांना तातडीने शिक्षा होणे, या गोष्टींची अंमलबजावणी झाली पाहिजे. आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर घडलेली घटना बॅकफुटवरील शिंदे सरकारकरिता सकारात्मक म्हणायला हवी. मागच्या काही दिवसांत बदलापूर प्रकरण, मालवणमधील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळण्याची घटना तसेच जरांगे यांच्या आंदोलनामुळे सरकार काहीसे अडचणीत सापडले होते. मात्र, या चकमकीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे व पर्यायाने महायुती सरकारचे प्रतिमासंवर्धन झाले, असे म्हणायला चांगलाच वाव आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :

.